मुंबई। नगर सहयाद्री:-
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला मिळालेल्या यशाच्या कौतुकात फार न अडकता पवार यांनी पुन्हा पायाला भिंगरी लावली आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने दहा जागा लढल्या आणि त्यापैकी आठ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आणि पक्ष सोडून गेलेल्यांच्या पदरी निराशा पडली. परंतु सोडून गेलेल्या सर्वच आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश बंदी नाही, असं पवारांनी सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसू शकतो.
राजकारणात धक्का देण्याची खासियत असलेल्या शरद पवारांनी आता आपले डावपेच बदलले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार हे अजित पवारांचं टेंशन वाढवणार आहेत. कारण पवार अजित पवारांच्या आमदारांसाठी आपल्या पक्षाची दारं खुली करणार आहेत. अजितदादांसोबत गेलेले आमदार निधीवाटप झाल्यानंतर परत येतील, सर्वच आमदारांना पक्षबंदी नसल्याचं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केल आहे.
लोकसभेतलं यश आणि आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या चेह-यांना संधी देणार असल्याचं पवारांनी सांगितल्यामुळे अजित पवारांच्या आमदारांमध्येच नव्हे तर संधीची अपेक्षा असलेल्या पवारांच्याही पक्षातले काहीजण नक्कीच अस्वस्थ झाले असतील. मात्र शरद पवारांच्या या गुगलीमुळे सर्वाधिक टेंशन अजितदादांचंच वाढलं असेल हे मात्र नक्की.
पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; आ. अमोल मिटकरी
शरद पवारांचं हे वक्तव्य फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. अजित पवारांसोबतचं कुणीच शरद पवारांकडे जायला तयार नसल्याने त्यांनी आता नव्या उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचं मिटकरी म्हणाले. आमच्या आमदारांवर आमचं बारीक लक्ष असून कुणी पक्षशिस्त मोडायचा प्रयत्न केला तर पक्ष त्यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचं मिटकरी यांनी स्पष्ट केलं.