अहमदनगर / नगर सह्याद्री
सहकार चळवळीच्या माध्यमातून समाजाला एकसंघ ठेवतानाच या चळवळीचा उपयोग ग्रामीण भागाच्या उत्कर्षा करीता त्यांनी दिलेला संदेश पुढे घेवून जाण्याचे काम येणा-या पिढीला करावे लागेल. पद्मश्रींच्या दुरदृष्टीचा विचार हा विकासासाठी आधारभूत ठरेल असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ४४ व्या पुण्यतिथी निमित्ताने मंत्री विखे पाटील यांनी डॉ.विखे पाटील फौंडेशनच्या प्रागणात असलेल्या पद्मश्री विखे पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन, अभिवादन केले. याप्रसंगी फौंडेशनच्या विविध विभागांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.
सहकार चळवळीचे बिज रोवून पद्मश्रींनी समाजातील नाहीरे वर्गाला ख-याअर्थाने आधार निर्माण करुन दिला. सहकार चळवळ ही शेतक-यांच्या असली तरी या चळवळीने ग्रामीण भागाच्या परिवर्तनात निर्माण केलेले स्थान खुप महत्वपूर्ण आहे. सहकारातून निर्माण झालेली शिक्षण व्यसथा ही ग्रामीण भागातील मुलांच्या उत्कर्षासाठी महत्वपूर्ण ठरली. इंग्रजी माध्यमांचे शिक्षण सुरु झाल्यामुळेच आज लाखो विद्यार्थी या शैक्षणिक संकुलातून देशाच्या कानाकाप-यात आपले यश सिध्द करुन दाखवित आहेत. हीच सहकार चळवळीची यशस्वीता असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
सहकार चळवळीपुढे अनेकांनी आव्हानं निर्माण करण्याचे प्रयत्न केले. पण लोकांच्या विश्वासामुळे ही चळवळ कोणीही मोडू शकले नाही. उलट या सहकार चळवळीचा आलेख उंचावत गेला. आज देशात सहकार मंत्रालय स्थापन होणे ही मोठी उपलब्धी सहकार चळवळीसाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेले सहकार मंत्रालय केंद्रीय मंत्री अमित शाह नेतृत्वाखाली गतीने पुढे जात आहे.
सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून होत असलेल्या निर्णयांचा लाभ गावातील प्राथमिक सोसायट्यांपासून ते सहकारी बॅंकींग आणि कारखानदारीपर्यंत सर्वच सहकारी संस्थान होत असल्याचे त्यांनी नमुद केले.