spot_img
अहमदनगरहोमग्राऊंडवरील विरोध लंके यांचं गणित बिघडविणार!

होमग्राऊंडवरील विरोध लंके यांचं गणित बिघडविणार!

spot_img

घरातूनच मोठा विरोध | मतांचा वाढलेला टक्का कुणाच्या फायद्याचा | विखेंची हुल अनेकांना उमगलीच नाही
सारिपाट / शिवाजी शिर्के
लोकसभा निवडणुकीत मोदी चारशेपारचा आकडा करणार किंवा कसे याबाबत उत्सुकता असली तरी त्याहीपेक्षा राज्याचे लक्ष लागून राहिले आहे ते नगरच्या निकालाकडे! दिल्लीतील प्रश्नांपेक्षा येथे चर्चा झाली ती गल्लीतील प्रश्नांची अन् अधिकार्‍यांना ठासून दम मारल्याची! विखे यांच्यासाठी कोणते कोणते फॅक्टर अडचणीचे ठरणार याचे गणित जसे मांडले जाते तसेच गणित मांडले जाते ते लंके यांच्याबाबतही! मतांचा वाढलेला टक्का म्हणजेच या मतदारसंघात यावेळी सव्वा लाखाच्या दरम्यान जास्तीचे मतदान झाले. वाढलेले हे मतदान कोणाची डोकेदुखी? होमग्राऊंड समजल्या जाणार्‍या पारनेरमधून नीलेश लंके हे मोठे मताधिक्य घेतील आणि तेच मताधिक्य त्यांना विजयश्री मिळवून देईल असे वाटत असताना प्रत्यक्षात उलटंच घडलं असल्याचे दिसून येत आहे. खरे तर सुजय विखे यांनी पारनेरच्या आडून नीलेश लंके यांना हुल दिली की नीलेश लंके यांनी हे सारे ओळखून सुजय विखे यांना घेरलं हे निकालानंतरच्या आकडेवारीतून समोर येणार आहे.

लोकसभा निवडणुकीतील विरोधी उमेदवाराचे होमग्राऊंड आपण दुर्लक्षीत केल्याची हूल सुजय विखे यांनी दिली आणि तीच हूल आज नीलेश लंके यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. पारनेर या स्वत:च्या होमग्राऊंडवरच नीलेश लंके यांना मोठा विरोध असल्याची जाणिव बाजार समिती आणि खरेदी विक्री संघाची निवडणुकीत विखे पाटलांना झाली होती. नीलेश लंके आणि विजय औटी हे दोघे एकत्र असतानाही विखे यांना बाजार समितीत पराभव पत्कारावा लागला असला तरी त्यांनी तब्बल ४६ टक्के मते मिळवली. खरेदी विक्री संघ तर विखे यांनी याच दोघांच्या विरोधात मोठ्या मताधिक्याने ताब्यात घेतला. पारनेरमध्ये या दोन निवडणुकांमध्ये विखे यांनी पेरणी केली आणि त्याचे पिक त्यांना लोकसभा निवडणुकीत पाहण्यास मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. निवडणूक लोकसभेची होती आणि ती पूर्णपणे फिरत राहिली पारनेरमध्ये! पारनेर या स्वत:च्या होमग्राऊंडवर आपण किमान एक लाख मतांचे लिड घेणार अशी दर्पोक्तीची घोषणा लंके व त्यांच्या समर्थकांकडून केली गेली. यानंतर सुजय विखे हे पारनेरमध्ये जास्त लक्ष घालतील असा अंदाज अनेकांना होता. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. स्वत: राधाकृष्ण विखे यांनी काही बैठका घेतल्या.

उमेदवार सुजय विखे यांनी दोन-तीन धावते दौरे केले. मात्र, मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात या दोघांनी पारनेरकडे पाठ फिरवली. पारनेरमध्ये विखे पाटलांकडून मतदारांना अमिष दाखवले जाऊ शकते, पैशाचा वापर केला जाऊ शकतो असा अंदाजही फोल ठरला. मतदानाच्या शेवटच्या आठवड्यात विखे परिवाराने पारनेरला जवळपास वार्‍यावर सोडून दिल्याचे वरकरणी दिसणारे चित्र वास्तवात वेगळेच होते. तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी विखे यांना साथ देण्याचा घेतलेला निर्णय मतदानाच्या दिवशीही प्रत्यक्षात तसाच दिसून आला. माजी आमदार विजय औटी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्यासह भाजपाचे प्रदेश सदस्य विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, राहुल शिंदे या भाजपातील निष्ठावानांसह स्वत: विखे पाटील घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या तालुक्यातील सर्वच घटकांनी खिंड लढवली. या सर्वांना डफडेवाले म्हणून हिणवण्यात स्वत: लंके व त्यांची टीम सोशल मिडियावर आक्रमक राहिली. मात्र, याच टीमच्या विरोधात त्यांच्या-त्यांच्या गावात काय परिस्थिती आहे याचा अंदाज स्वत: सुजय विखे यांना होता. त्यामुळे या सर्वांना उत्तरे देत न बसता किंवा त्यांचा प्रतीवाद न करता अतिशय शांतपणे पारनेरमधील टीमने संयमाने खिंड लढवली.

पारनेरमधून कोणत्याही परिस्थितीत नीलेश लंके यांना मताधिक्य मिळणार नाही याची काळजी सर्वांनीच घेतली. ‘बोगस मतदान घडवा’, अशी ऑडीओ क्लीप बाहेर येताच विखे समर्थकांनी दोन-तीन गावांचा अपवाद वगळता अन्यत्र ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे यंत्रणा हाती घेतली. बोगस मतदान होणार नाही याची काळजी घेतानाच आपला मतांचा टक्का कसा वाढेल यासाठी विखे समर्थक या तालुक्यात आग्रही राहिले. पारनेरमधील मतांचा टक्का वाढल्याने मताधिक्य वाढेल असा अंदाज काही राजकीय विश्लेषकांकडून मांडला जात असला तरी तो सपशेल खोटा निघाल्याचे प्रत्यक्ष मतमोजणीतूनच स्पष्टपणे समोर येेणार आहे. दुसरीकडे नीलेश लंके व समर्थकांनी पारनेरमधून जास्तीचे मताधिक्य कसे मिळेल यासाठी अटोकाट प्रयत्न केले. मात्र, ग्रामपंचायत- सोसायटी निवडणुकीत लंके यांच्यामुळे पराभूत झालेल्यांसह दुखावल्या गेलेल्या सार्‍याच घटकांनी ‘आता नाही तर कधीच नाही’ ही भूमिका घेतली आणि आपसातील मतभेद बाजूला ठेवत लंके यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यामुळेच पारनेरमधील अपेक्षीत असणारे एक लाखाचे मताधिक्य गाठणे लंके यांच्यासाठी मोठ्या जिकीरीचे ठरणार असल्याचे वाटते.

पारनेरमधून मिळणारे जास्तीचे मताधिक्य हेच लंके यांच्या विजयाच्या आकड्याचे गणित असणार आहे. मात्र, याच मताधिक्यासाठी त्यांना घरातच मोठा संघर्ष करावा लागल्याचे दिसून येते. मतमोजणीतील आकडेवारी बाहेर आल्यानंतर त्याबाबत चिंतनच करावे लागणार आहे. कारण, हीच आकडेवारी आणि नाराजी लंके यांच्यासाठी आता विधानसभा निवडणुकीसाठीची धोक्याची घंटा ठरल्यास आश्चर्य वाटू नये. पारनेर वगळता अन्य पाचही विधानसभा मतदारसंघात विखे पिता- पुत्रांसह त्यांच्या यंत्रणेने केलेले सुक्ष्म नियोजन लंके यांच्यासमोर येत होते. पारनेरमध्ये आपणच बाजीगर असल्याच्या थाटात लंके व त्यांची यंत्रणा राहिली. पारनेरमध्ये दुर्लक्ष केल्याचे वरकरणी विखेंकडून दिसून येत असताना लंके व त्यांची यंत्रणा गाफील राहिली. ‘पारनेरमध्ये कमसे कम एक लाख लिड’ असे ठणकावून सांगत असताना अन्य पाच मतदारसंघात विखे पिता- पुत्रांनी गावेच्या गावे पिंजून काढली. भाजपाच्या कार्यकर्त्यांची फळी सोबतीला होतीच! याशिवाय विखे कुटुंबाला कायम साथ देणारी बहुतांश राजकीय पक्षांमध्ये कार्यरत असणारी अनेक कुटुंबही यावेळी विखे यांनी सक्रिय केल्याचे दिसून आले.

नगर मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानाचा टक्का मागील वेळी म्हणजेच २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा दोन टक्क्यांनी वाढल्याचे दिसते. आकडेवारीनुसार सव्वा लाखांनी हे मतदान वाढलेय. मतदानातील वाढलेला टक्का हा नेहमी सत्ताधारी अथवा विद्यमान उमेदवारासाठी धोकादायक राहिल्याचे दिसून येते. काही विश्लेषकांच्या मतांनुसार हा सव्वा लाख मतांचा वाढलेला टक्का विखे यांच्यासाठी धोक्याचा मानला जात आहे. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत सुजय विखे हे जवळपास पावणेतीन लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते. मतांचा वाढलेला टक्का जर जय- पराजयाची गणिते मांडताना विचारात घ्यायचा असेल तर मग मागील वेळी मिळालेले मताधिक्यही विचारात घ्यावे लागेल. मागील वेळी सुजय विखे हे दोन- तीन हजारांच्या मताधिक्याने म्हणजेच निसटत्या पराभवाने नक्कीच विजयी झालेले नाहीत. पावणेतीन लाखांचे त्यांना मताधिक्य होते. यावेळी वाढलेल्या मतांच्या टक्क्यानुसार सव्वा लाख मते वाढलीत आणि ही सर्व मते लंके यांचीच असल्याचे गृहीत धरले तरी मागील निवडणुकीतील मताधिक्याची दीड लाख मते शिल्लक राहतात. त्यामुळे वाढीव मतांचा टक्का निर्णायक ठरणार असे मांडले जाणारे गणितच चुकीचे वाटते. नगर लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात.

शेवगाव- पाथर्डी या मतदारसंघात मतांचा टक्का वाढलेला नाही. अन्य मतदारसंघात हा टक्का वाढलाय. मतांचा टक्का वाढण्यामागे आणि कमी होण्यामागे काही कारणे सांगितली जातात. मात्र, त्याहीपेक्षा या मतदारसंघात दोन्ही बाजूने ग्रामपंचायत निवडणुकीच्या पद्धतीने गावागावात प्रत्येकाचे समर्थक मतांचा टक्का वाढण्यासाठी झगडले. शेतकर्‍यांची नाराजी मोठ्या प्रमाणात असल्याचे याही निवडणुकीत दिसले. मागील म्हणजेच २०१९ च्या निवडणुकीतही कांद्यासह शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न होते. पाच वर्षापूर्वी नवख्या असणार्‍या सुजय विखे यांना कांद्याच्या मुद्यावर अनेक गावांमध्ये घेरले गेले होते आणि त्यांना कांद्याच्या माळा देखील भेट देण्यात आल्या होत्या. विरोधी संग्राम जगताप यांचे गावागावात आतासारखेच ढोल पथकांनी स्वागत केल्याचे इतिहास साक्षी आहे. कांद्यासह शेतीपिकांच्या हमीभावाचा मुद्या त्यावेळी देखील शरद पवार यांच्यासह सार्‍याच विरोधकांनी उचलून धरला होता. गावागावात आता दिसून आले त्याहीपेक्षा जास्त आक्रमक शेतकरी दिसून येत होते.

आपण निवडून आलोच आहोत, गुलालाची तयारी करा अशी साद त्यावेळी संग्राम जगताप यांना त्यांचे काही उत्साही कार्यकर्ते घालत होते आणि संग्राम जगताप यांनाही आपणच खासदार झालोत असे वाटू लागले होते.त्यातूनच त्यावेळी त्यांनी येथील मतदान संपताच शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँगे्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली होती. त्या सभेत याच संग्राम जगताप यांनी विखे यांच्या विरोधात आपण खासदार झालोत अशा थाटात भाषण ठोकले होते. आता फरक इतकाच आहे की संग्राम जगताप यांच्या जागी आता नीलेश लंके आहेत आणि शेतकर्‍यांचे प्रश्नही तेच आहेत. मागील निवडणुकीवेळी नोटबंदी आणि जीएसटी हे दोन मुद्दे अत्यंत आक्रमकपणे समोर आले होते. नोटबंदीमुळे सामान्यांना झालेला त्रास, नोटा बदलण्यासाठी बँकांसमोर लागलेल्या रांगा आणि त्या रांगांमध्ये उभे राहून काही जणांना गमवावा लागलेला जीव असे मुद्दे अत्यंत प्रभावी होते. नोटबंदी आणि जीएसटीमुळे जनता वैतागली होती आणि आता कोणत्याही परिस्थिती मोदी सरकार नको अशीच भावना सामान्य जनतेत निर्माण झाली होती. मोदी सरकारला बहुमत मिळणार नाही असे वाटत असताना प्रत्यक्षात निकाल काय लागला हे आता सांगण्याची गरज नाही.

शहराचे नामकरण, जातीपातीतील ‘माधव’ फॅक्टर यासह काही नाराज नेते यांच्यामुळे विखे यांच्या विजयाचे गणित बिघडू शकते असा अंदाज बांधला जातो. याशिवाय भाजपातील एका नाराज गटाचा दाखलाही जोडला जातो. शहराच्या नामकरणामुळे मुस्लिम मतदार बाजूला पडला आणि तो भाजपा विरोधात मतदानाला बाहेर पडला हे वास्तव आहे. मात्र, दुसरीकडे हा मतदार बाहेर पडल्याची चर्चा सुरू होताच हिूंद मतदारही बाहेर पडला हेही वास्तव आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेकांनी नगर शहरात मुस्लिम मतदारांच्या रांगा पाहून भाजपला मतदान करण्याचा फक्त निर्णयच घेतला नाही तर त्यांनी मतदारांना बाहेर पडण्याचे आवाहन केले. त्यातूनच नगर शहरातील राष्ट्रीय पाठशाळा या उच्चभ्रू वसाहतीतील मतदान केंद्रावर मोठ्या उद्योजकांसह धनिकांनी सहकुटुंब रांगा लावल्या. या मतदान केंद्रावर अशा पद्धतीने मतदारांनी कधीच रांगा लावल्या नव्हत्या याचीही नोंद घ्यावी लागणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी मोडून तोडून दोन गट निर्माण केल्याचा भाजपावर आरोप होता. हा आरोप आणि त्याची सहानुभूती नगरमध्ये दिसून आली नाही आणि ती बिंबवली देखील नाही. स्थानिक उमेदवार, त्याचे शिक्षण, सामाजासाठीचे त्याचे योगदान अशाच मुद्यांवर मतदानाच्या दिवसापर्यंत ही निवडणूक झाली. ठाकरे गटाच्या सेनेचा प्रभाव नगर शहरात जास्त! मात्र, नगर शहरातील मुस्लिम मतदारांच्या रांगा पाहून हिंदू मतदारांना बाहेर काढण्यात याच ठाकरे गटाने भूमिका घेतली. माळी, धनगर समाजाची मते दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या बाजूने राहिल्याचे आता आकडेवारीतून समोर येईलच! नगर शहरात तो तिकडे म्हणून मी इकडे अशी भूमिका घेऊन अनेक आजी- माजी नगरसेवक प्रचारात सक्रिय होते. अनेकांनी दिवसा एक आणि रात्री एक अशा भूमिकाही बजावल्या आहेत. त्यामुळे धोकाधडी जशी विखेंच्या बाजूने गृहीत धरली जाते तशीच ती लंके यांच्या बाजूनेही!

मतदारसंघ निहाय साधारणपणे अंदाज घेतला तर पारनेर विधानसभा मतदारसंघात लंके यांना वीस हजार जास्तीचे मते मिळू शकतात. लंके यांच्या विरोधातील नाराजी जास्तच प्रमाणात उफाळून आल्यास विखे यांना पारनेरमध्ये लंके यांच्या बरोबरीची मते घेतल्यास आश्चर्य वाटू नये. अशीच परिस्थिती श्रीगोंदा तालुक्यात असू शकते. या दोन मतदारसंघांचा अपवाद वगळता अन्यत्र सुजय विखे हे मताधिक्य घेऊ शकतात. नगर शहरातून सुजय विखे यांना मोठे मताधिक्य मिळू शकते आणि हेच मताधिक्य सुजय विखे यांच्यासाठी विजयाचा आकडा मानले जात आहे. पारनेर या स्वत:च्याच होमग्राऊंडवर नीलेश लंके यांची मोठी पिछेहाट होणार असल्याचे मानले जाते आणि तीच त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरल्यास आश्चर्य वाटू नये. बाकी या मतदारसंघाचा निकाल धक्कादायक नसून अपेक्षीत असाच लागणार असल्याचा आमचा अंदाज आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोतकरांचं ठरलं! विधानसभेसाठी थोपटले दंड

अहमदनगर | नगर सह्याद्री - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी महापौर संदीप कोतकर यांनी दंड थोपटले...

मोहटादेवी यात्रोत्सव उत्साहात! दुसऱ्या दिवशी निघोज गटातील महिलांचा सहभाग

पारनेर । नगर सहयाद्री:- खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून व नीलेश लंके...

“तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा”; सुनील थोरात यांनी भगिनींना दिले आश्वासन

नवरात्र उत्सवानिमित्त सुनील थोरात यांच्या वतीने महिलांना साडी वाटप पारनेर । नगर सहयाद्री:- श्री. तुळजा भवानी...

कर्ज मिटविण्यासाठी उच्च शिक्षित तरुणाने लढवली शक्कल? पण एक चूक नडली, आन कारागृहाची वारी घडली..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज मिटविण्यासाठी एका उच्च शिक्षित तरुणाने भरदिवसा...