पाथर्डी | नगर सह्याद्री:-
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणा संदर्भात पुणे पोलिसांनी पाथर्डी आणि मुंबईत छापेमारी केली आहे. पोलीस आयएएस पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांना मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांना शोधत आहेत. त्या अनुषंगानेच पुणे पोलिसांनी पाथर्डी तालुयातील भालगाव येथील फार्म हाऊसवर छापेमारी केली असल्याची माहिती आहे.
बंदुकीने धाक दाखवत शेतकर्यांना धमकवल्याबाबत मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आता त्यांच्यासाठी पुणे पोलिसांनी पाथर्डीसह मुंबईतील विविध भागात छापेमारी सुरू केली आहे.
जिल्हाधिकार्यांनी मागितला अहवाल
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे नेत्रदोष आणि मानसिक आजारपणाचे दिव्यांग प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून दिल्याचे सिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याकडे याबाबत सविस्तर अहवाल मागविला आहे. सोमवारी सायंकाळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी या प्रकरणातील काही कागदपत्रे जिल्हाधिकार्यांना दाखवली. त्यांच्यासमवेत दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी असलेल्या तत्कालीन वैद्यकीय मंडळात सहभागी असलेले तीन सदस्यही होते. खेडकर यांना हे प्रमाणपत्र देताना काय तपासणी केली, त्याचे अहवाल व अधिकार्यांचा लेखी अभिप्राय जिल्हाधिकार्यांनी मागितला आहे.