आदिवासी समाजाची जमिन फसवणूक खरेदी करणे व विक्री करणे भोवले
अहमदनगर | नगर सह्याद्री
आदिवासी भिल्ल समाजाच्या मालकीचे जमिन खरेदी विक्री व्यवहार होत नसल्याचे माहिती असूनही महसूलमधील अधिकार्यांना हाताशी धरून त्या जमिनीची परस्पर खरेदी- विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणात अन्याय झालेल्या कुटुंबाने पोलिसात तक्रार केली होती. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. यानंतर संबंधितांनी न्यायालयात दाद मागितली आणि त्यानंतर न्यायालयीन आदेशाने गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे बंधू शिवाजीराव आनंदराव फाळके, राजेंद्र फाळके यांचे पुतणे जयवंत शिवाजीराव फाळके, राजेंद्र फाळके यांचे नातेवाईक माणिक पलांडे व दिनेश छाबरीया हे यात प्रमुख आरोपी असून नगरमधील उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांच्यावर देखील फसवणूक व ऍट्रासीटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झालेले बहुतांश आरोपी आता नॉटरिचेबल झाले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, निंबळक (ता. नगर) येथील आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबाच्या मालकीची जमीन परस्पर खरेदी करून लाटल्यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी नगरमधील व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, मंडलाधिकारी, तलाठी दुय्यम निबंधक अशा एकूण १२ जणांविरुद्ध फसवणूक व ट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक संपत भोसले यांनी दिली.
यासंदर्भात सिंधुबाई मुरलीधर निकम (७०, निंबळक, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. सिंधुबाई निकम यांनी प्रथम न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने फौजदारी दंड संहिता कलम १५६ (३) अन्वये पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
दिनेश भगवानदास छाब्रिया (सावेडी, नगर), सरला भगवानदास छाब्रिया (सावेडी, नगर), शिवाजीराव आनंदराव शेळके (कारेगाव, कर्जत, नगर), आशिष रमेश पोखरणा (सर्जेपुरा, नगर), जयवंत शिवाजीराव फाळके (कर्जत), आकाश राजकुमार गुरुनानी (हरदेवनगर, संत निरंकारी भवनमागे, सावेडी, नगर), माणिक आनंदराव पलांडे (पिंपळे रस्ता, मुखाई, पुणे), अजय रमेश पोखरणा (सर्जेपुरा, नगर), गौतम विजय बोरा (कापड बाजार, नगर), नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया (शोभासदन, छत्रपती संभाजीनगर रस्ता, डीएसपी चौक, नगर), कामगार तलाठी हरिश्चंद्र विजय देशपांडे (निंबळक, नगर) मंडलाधिकारी दिलीप श्रीधर जायभाय (नागपूर, नगर) व सहायक दुय्यम निबंधक, वर्ग दोन (नगर) या बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
निंबळक येथील गट क्रमांक ४०/२/३ मधील ५ हेक्टर ९८ आर व गट क्रमांक ४९/१/२ मधील २ हेक्टर ८५ आर मिळकत शिवाजी फाळके, माणिक पलांडे, दिनेश छाबरिया, जयवंत फाळके यांनी आपण व आपल्या कुटुंबीयांच्या अशिक्षित, अडाणीपणाचा, वयोवृद्धपणाचा गैरफायदा घेऊन कोर्या कागदावर व स्टॅम्पवर, इतर दस्तांवर सह्या, अंगठा घेऊन तत्कालीन सरकारी अधिकार्यांशी हातमिळवणी करत इतर हक्कात असलेल्या ’आदिवासी मिळकत हस्तांतरणास बंदी’ असा शेरा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता बेकायदा हटवून, मिळकत कगदोपत्री बेकायदा खरेदी करून घेतली तसेच ही मिळकत पुन्हा नव्याने अजय पोखरणा, गौतम बोरा, नरेंद्र फिरोदिया व इतर आरोपींना २१ जून २०२३ रोजी दस्तक्रमांक ४०४७, ४०४८ व ४०४९ अन्वये कटकारस्थान करून बेकायदा नोंदवून मला व कुटुंबाला भूमीही केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.