पुणे । नगर सहयाद्री
राज्यातील जनतेसाठी अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे. अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे महाराष्ट्रात आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.
राज्यात अखेर नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. राज्यातील शेतकर्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. राज्यात कधी पावसाचे आगमन होणार याची सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर आज पावसाचे आगमन झाले आहे. राज्यात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाले होते. तसेच मागील तीन ते चार दिवसापासून राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत होता.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर, उद्या दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.