जालना । नगर सहयाद्री
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात ते आज उपोषणाला बसणार आहे. पोलिसांनी मात्र त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. तरीही जरांगे आपल्या आमरण उपोषणावर ठाम आहे.
आज शनिवार दि. ८ जुन रोजी मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला.यावेळी ते बोलत होते. जरांगे पाटील म्हणाले, मी लोकसभा निवडणुकीचा विषय सोडून दिला असून आता सर्वत्र शांतता आहे. निवडणुकीत हार जीत होत असते,अंतरवाली सराटी येथील काही ग्रामस्थांनी माझ्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक निवेदन दिलं आहे. त्यामुळे पोलिसांनी माझ्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.
सरकारचे हे मोठे षडयंत्र आहे, गेल्या १० महिन्यांपासून या ग्रामस्थांनी निवेदन का दिलं नाही? असा सवाल करत राज्य सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. तत्काळ सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. अन्यथा विधानसभा निवडणुकीत आमदारांना नाव घेऊन पाडणार, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.
मनोज जरांगेंच्या उपोषणाला सरपंचांसह ग्रामस्थांचा पाठिंबा
मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण करण्यास परवानगी देऊ नका, असं निवेदन अंतरवाली सराटी गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं. या निवेदनावर गावातील काही नागरिकांच्या सह्या देखील होत्या. त्यानंतर पोलिसांनी जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली. मात्र, आता अंतरवाली सराटीतील वारं फिरलं आहे. सरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा कायदेशीर मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.