मुंबई / नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान प्रक्रिया पर पडत आहे. मुंबईमधील ५ जागांसह ठाणे, पालघर, धुळे, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. या सर्व मतदारसंघातील मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. पण काही ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होताच ईव्हीएमचा खोळंबा झाला आहे. ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. ईव्हीएम बंद पडल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
डोंबिवलीत ईव्हीएम बंद
कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. पण डोंबिवली पूर्वेकडील मंजुनाथ शाळेतील मतदान केंद्रात एक ईव्हीएम बंद पडले. सकाळपासूनच ईव्हीएम बंद आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. अशामध्ये नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ईव्हीएम दुरीस्तीचे काम सुरू आहे.
ठाण्यात ईव्हीएम बंद
ठाणे लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पण नौपाडा येथील ईव्हीएम बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. मतदान केंद्राबाहेर गर्दी झाली आहे त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी मशीन दुरूस्त करण्याचे काम करत आहेत. ठाण्यामध्ये ईव्हीएम बंद पडल्यानंतर महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी १ तास वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.
नाशिकमध्ये ईव्हीएम बंद
नाशिकमध्ये सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली. पण आडगाव परिसरात दोन ईव्हीएम बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांचा खोळंबा झाला. तर दुसरीकडे नाशिकमधील सिन्नर येथे ईव्हीएम बंद पडले. साडेसात वाजल्यापासून ईव्हीएम बंद आहे. फक्त दोन नागरिकांनी मतदान केल्यानंतर हे ईव्हीएम बंद पडले. निवडणूक आयोगाचे कर्मचारी ईव्हीएम दुरुस्त करण्याचे काम करत आहेत.
पालघरमध्ये ईव्हीएम बंद
पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेला असलेल्या दातिवरे येथे ईव्हीएम बंद पडले आहे. दातिवरे येथील बुथ क्रमांक 232 मधील ईव्हीएम बंद पडले आहे. गेल्या १५ मिनिटांपासून ईव्हीएम बंद असल्याने मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.