अहमदनगर। नगर सहयाद्री-
पुण्यानंतर आता अहमदनगरमध्ये कोयता गँगची दहशत वाढताना दिसत आहे. अहमदनगर शहरात नगर पुणे रोडवरील कायनेटिक चौकात रात्रीच्या वेळी कोयता गँगने चहाच्या टपऱ्यांची तोडफोड केली आहे. गुंडांनी हातात कोयता घेवून टपऱ्या पाडल्या आहेत. फक्त दहशत निर्माण करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी चंद्रकांत अशोक सातपुते (वय, वर्षे २९ ), प्रकाश राजु लोखंडे (वय,वर्षे ३०,दोघे रा. कोठला, अहमदनगर) यांना ताब्यात घेतले आहे.
मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात नगर पुणे महामार्गावरील सुपा गावात कोयता गँगच्या गुंडांनी दहशत निर्माण करण्यासाठी टपऱ्या पाडल्या होत्या. त्या हल्ल्यात दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा अहमदनगरमध्ये कोयता गँगची दहशत वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्रीच्या सुमारास कोयता गँगनी दहशत निर्माण करण्यासाठी टपऱ्यांची तोडफोड केली.
तसेच कोयता घेऊन रस्त्यावर आरडा ओरड केला. या हल्ल्यामुळे टपऱ्या मालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गुंडांचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून दोन लोखंडी कोयते जप्त केले आहे. कोयता गँगच्या या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.