अहमदनगर | नगर सह्याद्री
‘अबकी बार ४०० पार’चा उद्घोष करीत लोकसभा निवडणूक जिंकण्यास निघालेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अश्वमेध घोडा उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रात अडविला गेल्याने भारतीय जनता पक्षाला केंद्रात काठावरचे बहुमतही मिळविता आले नाही. मागच्या दोन निवडणुकात महाराष्ट्रात मोदींच्या पारड्यात भरभरून टाकले खरे परंतु या निवडणुकीत पार दाणादाण उडवून टाकली. केंद्रात भाजपला स्वबळावर काठावरचे बहुमतही मिळाले नाही.
मराठा आरक्षण, कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकर्यांमध्ये असलेला असंतोष अनैसर्गिक युती, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याप्रति असलेली सहानुभूती या सर्वांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला फटका बसला. राज्यातील प्रत्येक विभागात युतीला मतदारांनी दणका दिला आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मुंबई परिसर आदी सर्वच भागात युतीला दणका बसला आहे. चाराटंचाई, पाणीटंचाई आदींसह दुष्काळाने पिचलेल्या शेतकर्यांनी ‘राम मंदिर, थांबलेले बाँबस्फोट, महामार्गांचे पसरलेले जाळे, वंदे भारत एक्स्प्रेस’ आदी कोणतेच मुद्दे विचारात घ्यायचा प्रश्नच ठेवला नाही.
सातार्यात उदयनराजे भोसले, रावेरमध्ये रक्षा खडसे, सिंधुदुर्गात नारायण राणे असे युतीचे लक्षवेधी विजय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बारामती, शिरूर, माढा असे लक्षवेधी विजय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांचा विजय तेवढाच अजित पवारांना अल्प दिलासा देणारा ठरला. महाराष्ट्रात भाजप ११, शिंदे गट ०६ तर अजित पवार गट ०१ जागेवर समाधानी. तर काँग्रेस १२, उबाठा १० आणि शरद पवार गट ०७ जागांवर समाधानी. महाविकास आघाडीला २९ तर महायुतीला १७ जागांवर विजय मिळाला.
अजितदादांचा अपेक्षाभंग
ज्या काकांमुळे अर्थात शरद पवारांमुळे अजितदादा पवार सत्तेचे सोपान पार करत गेले, त्याच काकांना टाटा करीत त्यांनी भाजप-सेना युतीचा हात पकडला; परंतु ‘ये हाथ नही फाँसी का फंदा है’ याचा प्रत्यय दादांना आत आलाच असेल. खुद्द बारामतीत शरद पवार यांच्या लेकीच्या अर्थात आपल्या चुलत बहिणीच्या विरोधात स्वत:ची पत्नी सुनेत्राताई पवार यांना उभे केले व कौटुंबिक जिव्हाळा कलूषित करून टाकला. सुप्रिया ताईंचा पराभव होणार आणि सुनेत्रा वहिनींच्या गळ्यात विजयमाला पडणार अशी हवा पण त्यांंनी निर्माण केली; परंतु सुप्त मानसिकता बाळगून असलेल्या बारामतीतील मतदारांना दादांची ही भूमिका आवडली नाही नि त्यांनी सुनेत्रा वहिनींना ‘टाटा’ केला.
सांगलीत अपक्ष विशाल पाटलांचा दणदणीत विजय
लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विषाल पाटलांचा विजय झाला आहे. विषाल पाटलांनी मोठ्या मताधियाने या जागेवर दणयात विजय मिळवला आहे. निवडणुकीचा निकाल पाहून मी भारावून गेलो आहे. एक अपक्ष उमेदवार, वसंतदादांचा नातू लढतोय म्हणून जी साथ मिळाली आहे ती अद्भुत होती, असे विशाल पाटील म्हणाले. निवडणुकीत प्रत्येक गोष्टीला अडचणीत आणण्याचे काम भाजपने केले, चिन्ह चोरले, वेगवेगळी आमिष दाखवली, पैशांचा बेफाम वापर केला. सगळं करून सुद्धा माझा आज विजय झाला आहे. जनतेचा मी आभारी आहे तसेच प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिल्यामुळे मला मोठे मताधिय मिळाले. संविधानाचा रक्षक म्हणून मी संसदेत जात आहे. संविधानाचे रक्षण करण्याचे काम मी चांगल्या प्रकारे करेन.
ठाण्याचा बालेकिल्ला शिंदेंचाच, नरेश म्हस्के ठरले जायंट किलर
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी विद्यमान खासदार राजन विचारे यांचा दारुण पराभव केला. उद्धव ठाकरे यांनी विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता मात्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या बालेकिल्यात वर्चस्व सिद्ध करत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
उदयनराजे विजयानंतर भावूक
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे यांनी चीतपट केले आहे. उदयनराजे भोसले यांचा मागील निवडणुकीत पराभव झाला होता, या पराभवाचा वचपा यंदाच्या निवडणुकीत उदयनराजेंनी काढला. उदयनराजे यांचा विजय होताच ते भावूक झाल्याचे दिसून आले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार उदयनराजे भोसले यांना ३ लाख ४२ हजार २६८ मताधिय मिळालंय, तर महाविकास आघाडीचे उमदेवार शशिकांत शिंदे यांना ३ लाख ३७ हजार १८६ मते मिळाल्याचे समोर आले आहे.
भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी हालचाली
लोकसभा निवडणुकीचे कल आता स्पष्ट झाले. सध्या देशात भाजपप्रणित एनडीए आघाडीवर असून त्यापाठोपाठ इंडिया आघाडीच्या जागा आल्या आहेत. एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करू शकते. मात्र, भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी शरद पवारांनी हालचाली वाढवल्या आहेत. शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी आतापर्यंतचा कल हा परिवर्तनाला पोषक असून उद्या दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.
मिळालेले यश कार्यकर्त्यांचे ः शरद पवार
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय कष्ट घेतले. त्याबद्दल संघटनेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राचा कल परिवर्तनाला पोषक आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही दहा जागा लढल्या. त्यातील काही जागांवर अपयश आले. मिळालेले यश आमच्या एकट्याचं ़यश नाही, तर हे महाविकास आघाडीचं यश आहे. आमच्यासोबत आमच्या मित्रपक्षांनीही यश मिळवलं आहे. हे सगळं यश काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि आमच्या कार्यकर्त्याचे आहे, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले. इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सिताराम येचुरींसह अन्य लोकांशी चर्चा केली. उद्या आमची बैठक होण्याची शयता आहे. आम्ही एकत्रित राहू. उद्याचं बैठकीत आम्ही धोरणं ठरवू. उद्याची बैठक ही दिल्लीला होऊ शकतो, असंही पवार म्हणाले.
महाराष्ट्र परिवर्तनाच्या दिशेने
राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. राज्यात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. राज्यातील उमेदवारांचा विजयी उत्सवाची घौडदौड सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मानत शरद पवार यांनी महाराष्ट्र परिवर्तनाच्या दिशेने असल्याचे सूचक व्यक्त केले आहे.
उमेदवार विजयी पराभूत
उत्तर मुंबई – पीयूष गोयल (भाजप) भूषण पाटील (काँग्रेस)
उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तिकर (ठाकरे गट) रवींद्र वायकर (शिवसेना)
दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई (ठाकरे गट) राहुल शेवाळे (शिवसेना)
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत (ठाकरे गट) यामिनी जाधव (शिवसेना)
पुण े- मुरलीधर मोहोळ (भाजप) रवींद्र धंगेकर (काँग्रेस)
बारामती – सुप्रिया सुळे (पवार गट) सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी)
शिरुर – डॉ. अमोल कोल्हे (पवार गट) शिवाजी आढळराव पाटील (राष्ट्रवादी)
सांगली – विशाल पाटील (अपक्ष ) संजयकाका पाटील (भाजप)| चंद्रहार पाटील (ठाकरे गट)
हातकणंगले धैर्यशील माने (शिवसेना) सत्यजीत पाटील (ठाकरे गट)
मावळ श्रीरंग बारणे (शिवसेना) संजोग वाघेरे-पाटील (ठाकरे गट)
दिंडोरी भास्करराव भगरे (पवार गट) डॉ. भारती पवार (भाजप)
नाशिक राजाभाऊ वाजे (ठाकरे गट) हेमंत गोडसे (शिवसेना)
जळगाव स्मिता वाघ (भाजप) करण पवार (ठाकरे गट)
रावेर रक्षा खडसे (भाजप) श्रीराम पाटील (पवार गट)
अहमदनगर नीलेश लंके (पवार गट) सुजय विखे पाटील (भाजप)
शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट) सदााशिव लोखंडे (शिवसेना)
परभणी संजय जाधव (ठाकरे गट) महादेव जानकर (रासप)
जालना डॉ. कल्याण काळे (काँग्रेस) रावसाहेब दानवे (भाजप)
औरंगाबाद संदिपान भुमरे (शिवसेना) चंद्रकांत खैरे (ठाकरे गट)
बीड पंकजा मुंडे (भाजप पराभूत) बजरंग सोनवणे (पवार गट विजयी)
धाराशिव ओमराजे निंबाळकर (ठाकरे गट) अर्चना पाटील (राष्ट्रवादी)
बुलडाणा प्रतापराव जाधव (शिवसेना) नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट)
रामटेक श्यामकुमार बर्वे (काँग्रेस) राजू पारवे (शिवसेना)
नागपूर नितीन गडकरी (भाजप) विकास ठाकरे (काँग्रेस)
भंडारा-गोंदिया डॉ. प्रशांत पडोळे (काँग्रेस) सुनील मेंढे (भाजप)
गडचिरोली-चिमूर डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस) अशोक नेते (भाजप)
चंद्रपूर प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) सुधीर मुनगंटीवार (भाजप)
भिवंडी सुरेश म्हात्रे (पवार गट) कपिल पाटील (भाजप)
कल्याण श्रीकांत शिंदे (शिवसेना) वैशाली दरेकर (ठाकरे गट)
ठाणे नरेश म्हस्के (शिवसेना) राजन विचारे (ठाकरे गट)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग नारायण राणे (भाजप) विनायक राऊत (ठाकरे गट)
सातारा उदयनराजे भोसले (भाजप) शाशिकांत शिंदे (पवार गट)
वर्धा अमर काळे (पवार गट) रामदास तडस (भाजप)
उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाड (काँग्रेस) उज्ज्वल निकम (भाजप)
रायगड सुनील तटकरे (राष्ट्रवादी) अनंत गीते (ठाकरे गट)
कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस) संजय मंडलिक (शिवेसना)
पालघर डॉ. हिेमंत सावरा (भाजप) भारती कामडी (ठाकरे गट)
लातूर शिवाजीराव काळगे (काँग्रेस) सुधाकर श्रृंगारे (भाजप)
सोलापूर प्रणिती शिंदे (काँग्रेस) राम सातपुते (भाजप)
अमरावती बळवंत वानखेडे (काँग्रेस) नवनीत राणा (भाजप)
अकोला अनुप धोत्रे (भाजप) अभय पाटील (काँग्रेस) | प्रकाश आंबेडकर
नंदुरबार गोवाल पाडवी (काँग्रेस) डॉ. हिना गावित (भाजप)
माढा धैर्यशील मोहिते पाटील (पवार गट) रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
यवतमाळ| वाशिम जय देशमुख (ठाकरे गट) राजश्री पाटील (शिवसेना)
हिंगोली नागेश पाटील आष्टीकर (ठाकरे गट) बाबूराव कदम (शिवसेना)
धुळे सुभाष भामरे (भाजप) डॉ. शोभा बच्छाव (काँग्रेस)
उत्तर पूर्व मुंबई संजय दिना पाटील (ठाकरे गट) मिहीर कोटेचा (भाजप)
नांदेड – वसंतराव बळवंतराव चव्हाण (काँग्रेस) प्रताप पाटील चिखलीकर (भाजप)