नगर सहयाद्री वेब टीम
डिजिटलाच्या जमान्यात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, वाहन चालवताना त्याचा वापर करणे महागात पडू शकतो. तरीही, बरेच लोक कॉल किंवा मेसेज करण्यासाठी गाडी चालवताना त्याचा वापर करतात. लोक वाहन चालवताना सोशल मीडिया तपासण्यासाठी फोन वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का की गाडी चालवताना मोबाईल वापरणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी तुम्हाला दंडही होऊ शकतो?
गाडी चालवताना एखाद्याला कॉल करणे किंवा मेसेज करण्यासाठी तुम्हाला हजारो रुपये मोजावे लागू शकतात. त्यामुळे चुकूनही अशी चूक करू नये. त्यामुळे अपघाताचाही धोका असतो. पण वाहन चालवताना फक्त स्मार्टफोन वापरल्याबद्दल वाहतूक पोलीस दंड वसूल करु शकतात का? वाहन चालवताना फोनवर बोलणे किंवा फोन वापरल्याने दंड आकारला जातो असे बहुतेकांना वाटते. फक्त फोन हातात ठेवल्याबद्दल दंड आकारला जातो की नाही ते आपण पाहूया.
भारतीय कायद्यानुसार वाहन चालवताना मोबाईल फोन वापरल्यास चालान देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोटार वाहन (सुधारणा 2019) कायदा, 1988 च्या कलम 184 अन्वये, ड्रायव्हिंग करताना हॅन्डहेल्ड कम्युनिकेशन डिव्हाइस वापरणे बेकायदेशीर आहे. याचा अर्थ असा की तुम्ही कॉल करा किंवा न करा, फक्त मोबाईल हातात धरल्यास दंड होऊ शकतो.
काय सांगतो कायदा?
मोटार वाहन (सुधारणा 2019) कायदा, 1988 चे कलम 184 धोकादायक ड्रायव्हिंगशी संबंधित आहे. स्वत:ची आणि इतरांची सुरक्षा धोक्यात घालून धोकादायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांवर कलम 184 अन्वये कारवाई केली जाते. वाहन चालवताना मोबाईल फोन वापरल्यास 1,000 ते 5,000 रुपये दंड होऊ शकतो. याशिवाय 6 महिने ते 1 वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. तुम्ही कायद्याचे उल्लंघन केल्यास तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स काही महिन्यांसाठी रद्दही होऊ शकतो.