मंदिरांमध्ये भाविकांची पहाटे पासून दर्शनाला गर्दी
अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहरात हनुमान जयंती मोठ्या उत्सहात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरी झाली. शहरात सर्व भागांमध्ये मोठ्या संख्येने रामभक्त हनुमानाची मंदिरे आहेत. अयोध्येत श्रीराम मंदिर झाल्याने नुकतीच श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी झाल्यानंतर आज रामभक्त हनुमानाचाही जन्मोत्सव शहरात मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा झाला.
शहरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सर्जेपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सूर्योदय वेळी हनुमान जयंती भक्तिभावाने साजरी झाली. यानिमित्त पहाटे हनुमानाच्या मूर्तीला महाभिषेक व विधिवत पुजा करून हनुमान चालीसा पाठ, श्रीराम नामाचा जप व आरती करून हनुमंताच जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
बरोबर सुर्यदयाच्या वेळी उपस्थित शेकडो भाविकांनी जय श्रीराम… जय श्री हनुमान… असा जयजयकार करत पाळणा हलवून हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला.श्री हनुमान जयंतीनिमित्त येथील मंदिरामध्ये पहाटे पासूनच भाविकांची दर्शनासाठी लगबग सुरू होती. यानिमित्त मंदिरात अंतर्गत सजावट व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
स्पीकरवर हनुमान चालीसा पाठ व भक्तिगीते लावण्यात आली. हनुमान जयंती निमित्त सर्जापुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे पुजारी कन्हैय्यालाल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याआला, अशी माहिती प्रवीण परदेशी यांनी दिली.