जामखेड । नगर सहयाद्री
मोठ्या थाटामाटात विवाह पार पडल्यानंतर नव दाम्पत्य सुखी संसाराचे स्वप्न पाहत होते. बावीस दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली होती. अशातच सासरी गेलेली नव वधू आनंदात होती. नवरी घरात असल्याने जल्लोषाचे वातावरण होते. मात्र अचानक सर्वजण शोकसागरात बुडाले. सुखी संसार सुरू होण्यापूर्वीच त्यात विरजण पडले.
सुरज महादेव मिसाळ या बावीस वर्षीय तरुणाचा लग्न झाल्यानंतर अवघ्या बावीस दिवसातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरज महादेव मिसाळ हा तरुण बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मामाबरोबर साईनाथ मेडिकल हे दूकान चालवत होता. दि २४ मे रोजी मेडिकल मधुन घरी आल्यावर छातीत दुखू लागल्याने ताबडतोब जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले पण तोपर्यंत डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मिसाळ कुटुंबिय तसेच नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.