मुंबई । नगर सहयाद्री:-
आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) तर काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज संपूर्ण कोकणात ऑरेंज अलर्ट आहे. रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातही पावसाचा यलो अलर्ट आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मुंबई, आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
काल मध्यरात्रीपासून बुलढाणा जिल्ह्यात जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. आज सकाळी शेगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडला, ज्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकत्याच पेरणी केलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. भोगावती नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठावरील घरांमध्ये पाणी शिरले आहे. चैनी रोड परिसरातील गोविंद नगर येथील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. वरवाडे भागातील हातगाड्या, टपऱ्या आणि दोन मोटारसायकली वाहून गेल्या आहेत. अमरावती नदीलाही पूर आला आहे.
नदीच्या पुरामुळे काही नागरिकांचा संपर्क तुटला आहे. अनेक वर्षानंतर एवढा मोठा पूर आल्याने नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.