शरद रसाळ। सुपा
नगर पुणे रस्त्यावरील सुपा औद्योगिक परिसर व बस स्थानक परिसर तसेच सुपा पारनेर रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे टपऱ्या आस्थापनांची कार्यालये तसेच इतर अनधिकृत बांधकामांवर आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात हातोडा टाकण्यात आला. एमआयडीसीचे अधिकारी तसेच महसूल व पोलीस प्रशासन यांचे वरिष्ठ अधिकारी, अतिक्रमण विरोधी पथक आणि बांधकाम विभाग कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून हा अतिक्रमणाचा प्रश्न आणि त्याबाबत तक्रारी होत्या. रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमन आणि त्यामुळे वाहतुकीला होणारा अडथळा हा ही मोठा विषय होता. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने त्यावर कारवाई होत नव्हती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू असतानाच या अतिक्रमणावर हातोडा टाकण्यात आला.
कोणाचाही मुलाहिजा व विरोध न बाळगता पथकाने अतिक्रमणे काढण्यासाठी जेसीबी व अन्य यंत्रांचा वापर केला. काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली. या मोहिमेमुळे अतिक्रमण धारकांसह परिसरात मोठी धावपळ उडाली. सुपा बस स्थानकापासून ते पारनेर रोड पर्यंतची अतिक्रमणे काढण्याची कारवाई सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.
सुपा पारनेर रोडवरील रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या आधीच सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस दिल्या होत्या.
रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण काढावे यासाठी अतिक्रमण रेषा ही आखून दिली होती. तरीही अतिक्रमण काढले गेले नसल्याने आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाच्या वतीने मोहीम राबवली गेल्याची माहिती नगर पारनेर तालुक्याचे प्रांताधिकारी गणेश राठोड यांनी दिली.
सर्व अतिक्रमण हटविणार
सकाळी सुपा पारनेर रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्यास आम्ही सुरूवात केली. हे अतिक्रमण औद्योगिक वसाहत चौकापर्यंत सुरू राहणार आहे. वेळ मिळाल्यास पुढे अतिक्रमण काढण्यात येईल. हे अतिक्रमण काढून पूर्ण झाल्यानंतर नगर- पुणे महामार्गावरील अतिक्रमण काढण्यात येईल.
-गणेश राठोड, प्रांताधिकारी.
सुपा-पारनेर रस्त्याने घेतला मोकळा श्वास
सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. दुकाने रस्त्यावर थाटल्याने वाहतूकीचा नेहमी खोळंबा होत. बुधवारी बाजारच्या दिवशी वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली होती. याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. तर चोर्यांचे प्रमाण वाढले होते. हे सर्व अतिक्रमण काढण्यात आल्याने सुपा – पारनेर रस्त्याने प्रथमच मोकळा श्वास घेतला. या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.