अहमदनगर | नगर सह्याद्री
स्थानिक गुन्हे शाखा व पारनेर पोलिसांनी कारवाई करत गावठी कट्टासह व दोन जिवंत काडतुस हस्तगत करत तिघांना जेरबंद केले आहे. नगर पुणे महामार्गावरील गव्हाणवाडी फाट्यावर ही कारवाई केली. प्रमोद ऊर्फ अंकित किसनराव भस्के (वय २८ रा. मरकळ, ता. खेड, जि. पुणे), दीपक गोविंदा पाटील (वय २३ रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे), माऊली दादासाहेब भांबरे (वय १९ रा. आळंदी, ता. खेड, जि.पुणे) अशी त्यांची नावे आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अग्निशस्त्रे बाळगणार्या व्यक्तींवर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार भाऊसाहेब काळे, दत्तात्रय हिंगडे, रवींद्र कर्डिले, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, विजय ठोंबरे, बाळासाहेब गुंजाळ व संभाजी कोतकर यांचे पथक पारनेर हद्दीत संशयतांची माहिती घेत असताना रोहित शिवाजी गवळी (रा. जवळ, ता. पारनेर) याने प्रमोद किसनराव भस्के याच्याकडून गावठी कट्टा खरेदी केला असून तो पुणे येथून नगरकडे चारचाकी वाहनातून येणार आहे, अशी माहिती पारनेर पोलीस ठाण्याचे सहा.
पोलीस निरीक्षक खंडागळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला दिली. पथकाने पारनेर पोलीस ठाण्याचे अंमलदार गहिनीनाथ यादव, विवेक दळवी, मयुर तोरडमल यांना सोबत घेत गव्हाणवाडी फाटा येथे सापळा लावला. संशयित कार येताच पथकाने कार थांबविण्याचा इशारा केला असता कार थांबताच त्यातील तिघे पळून जावू लागले. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करून त्यांना जेरबंद करण्यात आले आहे.