spot_img
अहमदनगरगणेशोत्सव: कार्यकर्ता घडविणारा अखंड कारखाना राहिलाय का!

गणेशोत्सव: कार्यकर्ता घडविणारा अखंड कारखाना राहिलाय का!

spot_img

समाजकारण-राजकारणाचे बाळकडू मिळणारा मंडप जुगारी अड्डा अन् गुंड- मवाल्यांच्या ताब्यात गेल्याचं बाप्पाला दु:ख! ‘जय आनंद महावीर’ची ‘सुरक्षीत छकुली’ बाप्पाला भावली!

मोरया रे…. / शिवाजी शिर्के
डीजेच्या मुद्यावर थेट विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणजेच आयजी असणार्‍या दत्तात्रय कराळे यांची फिरकी घेणारा बाप्पा आज कोणत्या विषयावर बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. उत्सवाचं बदललेलं हिडीस स्वरुप पाहून कानठळ्या बसणार्‍या डीजेला आवर घालण्याचं आर्जव त्याने कराळे साहेबांकडे केलं असं मनातल्या मनात विचार करत असताना मी चितळेरस्त्यावर आलो होतो. पहिल्याच चौकात एका कोपर्‍याकडे माझं लक्ष गेलं आणि नजरानजर होताच बाप्पानं मला खुणावलं! मी त्याच्या इशार्‍यानेच त्याच्याकडे चालता झालो. बाजूलाच रस्त्याच्या कडेला असणार्‍या एका चहाच्या टपरीवर चहासाठी बैठक मारली. मी काही बोलण्याच्या आधीच बाप्पा बोलता झाला!

श्रीगणेशा- माझ्या उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक मंडळाच्या मंडपात मिळणारं जीवनाच्या वास्तवतेचे ज्ञान पुढच्या वाटचालीत राजकारण, समाजकारण करताना उपयोगी पडते का रे!
मी- (बाप्पानं एकदम गंभीर विषय घेतल्याचं मी ताडलं!) असा एकदम विषयांतर करुन का बोलत आहेस! त्या कुत्र्यांच्या लसीकरणासह डीजे बंदीचा विषय मार्गी लागला का रे!
श्रीगणेशा- या दोन्ही विषयांवर मी बोलणार आहेच! याशिवाय तुमच्या नगरी राजकारणावरही बोलणार आहे. मात्र, माझ्या उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक भान जपणारे अनेक कार्यकर्ते घडले आणि यातीलच काही विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. काही खासदार झाले तर काही आमदार! काही नगरसेवक झाले तर काही नगराध्यक्ष! काही महापौर झाले! मात्र, आता सारंच बदललंय असं वाटतेय! यापुढे असे सामाजिक भान जपणारे कार्यकर्ते तयार होतील की नाही याबद्दल मीच साशंक आहे.

मी- बाप्पा, असं काहीही होणार नाही! सामाजिक भान जपणारे अनेक कार्यकर्ते तयार होतील आणि तुझ्या उत्सवाची परंपरा देखील चालूच ठेवतील. खरं तर तुझा गणेशोत्सव म्हणजे संस्कृती आणि परंपरेचे संचित समृद्ध करणारा लोकोत्सव. या उत्सवातून गणेश मंडळे सामाजिक भान, जिव्हाळा, अवतीभवतीच्या माणसांच्या दुःखाला वाचा फोडत आलेली दिसतात. त्याचे बाळकडू अर्थातच मिळते ते गणेशोत्सवातील तुझ्या याच मंडपात! समाजकारण आणि राजकारणाची बालवाडी म्हणूनही गणेश मंडळे ओळखली जातात. तझ्या याच गणेश मंडळरुपी शाळांंतून अनेक राजकीय नेत्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा करून दिल्ली गाठली आहे. त्यामुळे गणेशोत्सव हा संस्कृतीरक्षणाबरोबरच कार्यकर्ते घडविणारी चालतीबोलती शाळा बनला आहे. आजवर अनेक मातब्बर मंडळींनी येथील गणेश मंडळापासून सामाजिक कार्याला आरंभ केलेला दिसतो. मंडळाच्या कार्यकर्त्यापासून सुरू होणारा हा प्रवास टप्प्याटप्प्यांवर बहरत गेल्याचं आम्ही सर्वांनीच अनुभवलंय!
श्रीगणेशा- तू बोलतोस तेही खरं आहे. गल्लोगल्ली, चौकाचौकात असणार्‍या मंडळाच्या अध्यक्षपदापासून सामजिक कार्याचा अंगी घेतलेला वसा हा हळूहळू व्यापक होत जातो हे वास्तव सत्य आहेच. अध्यक्षापासून एकेक पाऊल पुढे टाकले जाते आणि ध्येयाकडे वाटचाल सुरू होते. त्याची पहिली पायरी म्हणजे नगरसेवक पद. तेथून आमदार, खासदार आणि मंत्रीपदापर्यंत पोहोल्यावरही ‘आपले मंडळ’ ही माणसे कधीही विसरत नाहीत. त्यामुळे माझ्या उत्सवात राजकारणातील पदांंचे, मानसन्मानाचे जोडे बाजूला ठेऊन ही सर्व मंडळी सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत रस्त्यावर उतरत आपल्या माणसांंत मिसळत असतात.
मी- बाप्पा, खरं सागू का! अरे ही किमया घडविण्याची ताकद फक्त तुझ्या उत्सवातच आहे. त्यामुळेच जनसामान्यांच्या जगण्याला नवा अर्थ आणि नवी उमेद मिळत आली आहे.
श्रीगणेशा- माणसांना जगण्याचे बळ देणारा माझा उत्सव परस्पर संबंधांतून मानवी मनाचा आविष्कार घडवत आला आहे. त्यातून अभिव्यक्त होणारा अनुभवाचा कसदारपणाही जाणवतो. अनंत जाणिवा वेचणारी, जीवनातील मूलभूत प्रश्नांकडे गंभीरपणे बघण्याची दृष्टी देणारा हा उत्सव लोकाभिमुख विचार करायला लावत आला आहे. मंडळांंमध्ये काम करताना संकटाच्या काळात धावून जाणार्‍या कार्यकर्त्यांना समाजातील होरपळणारी मने, त्यांच्या दुःखाची जाणीव ही मंडळात प्रत्यक्ष काम करताना होते. समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या माणसांना त्यातून बाहेर काढण्याचे काम गणेश मंडळांच्या माध्यमातून कार्यकर्ते करत असतात. समाजातील वास्तवता, सामाजिक विषमता, दांभिकता, अत्याचार, समाजातील विकृतता, सामान्य माणसाची विविध पातळ्यांवर होणारी होरपळ टिपण्याचे ज्ञान गणेश मंडळाच्या माध्यमातून मिळत असते. त्यातून जगण्याचा नवा अर्थ दिसून सामान्यांच्या हक्कासाठी पेटून उठणारे नेतृत्त्व उदयास आल्याचे मीही पाहिले आहे. पुण्या- मुंबईच्या जोडीने नगरमधील गणेशोत्सवाला आणि राजकीय नेतृत्वाला सामजिकतेचे वलय मिळत आले आहेे.

माझ्या उत्सवाच्या निमित्ताने तयार झालेल्या गणेश मंडळांंच्या मुशीतून तयार झालेले राजकीय नेतृत्त्व हे कायम जनजाणिवेची निष्ठा असलेले, माणसांना जगण्याचे बळ देणारे, दीन दुबळ्यांच्या आंतरिक मनाला चैतन्याची जाणीव करून देणारे राहिले आहे. स्व. अनिल राठोड, स्व. दिलीप गांधी हे पडद्याआड गेले असले तरी त्यांची ओळख माझ्याच उत्सवाच्या माध्यमातून नगरकरांना झाली. आज तीच परंपरा अनेक कार्यकर्ते पुढे नेटाने नेताना दिसत आहेत. नगर शहरातील राजकीय नेतृत्वांंचा धांडोळा घेतल्यास प्रत्येकाच्या समाज जीवनाचे मूळ हे गणेश मंडळाशी येऊन मिळत असून आमदार संग्राम जगताप हे त्यातूनच मिळालेले नेतृत्व आहे. गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते लोकप्रतिनिधी असा नावलौकिक मिळविलेल्या अनिलभैय्या राठोड, दिलीप गांधी यांच्या पाठोपाठ आता ही परंपरा संग्राम जगताप यांनी नेटाने पुढे चालू ठेवल्याचे दिसते. नगरमधील सार्वजनिक मंडळांशी संग्राम जगताप यांचा अनेक वर्षांपासून थेट संपर्क आहे आणि त्यांनी या मंडळांना त्यांची कुवत आणि ताकद ओळखून त्यांना प्रोत्साहन आणि पाठींबा देत नगरी राजकारणावर वर्चस्व मिळविण्याचे काम अनिल राठोड यांच्यानंतर आता संग्राम जगताप यांनी लिलया साधलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मी- बाप्पा, वास्तवाचा विचार केला तर नगर शहरातील आजी- माजी नगरसेवकांच्या यादीवर नजर टाकली तर यातील ९० टक्के नगरसेवक तुझ्याच मंडपात तयार झालेले दिसतात! शहरी भागातील तुझ्या उत्सवाच्या निमित्ताने तयार होणारी मंडळे हीच नगरच्या राजकारणाच्या जीवनधमन्या झाल्या असं म्हटलं तरी चालेल!
श्रीगणेशा- मी कौतुक करतोय याचा अर्थ तू देखील कौतुक करायचं असं आहे का? अरे बाबा, राजकीय नेतृत्वाला जनजाणिवेची निष्ठा आणि जनसमुदायाचे प्रतिनिधित्त्व करण्याचे जीवनशिक्षण मिळण्यासाठीच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी माझा उत्सव सुरू केला! त्यांनी ज्या उद्देशाने माझा उत्सव सुरू केला तो उद्देश दिसून येत आहे का या प्र्रश्नाचं उत्तर मी शोधतोय! माझ्या उत्सवाच्या निमित्ताने वर्गणी जमा करणे ठिक रे! पण, काही जण खंडणी मागतात त्याचे काय? माझ्या मंडपात राबून अनेक नगरसेवक, आमदार तयार झाले रे! पण, त्याच मंडपात बसून जुगार- क्लब चालवला जात असेल त्याचे काय? आरस- देखावा तयार करुन सामाजिक भान जपणं आणि त्यातून जनजागृती करणं, अनिष्ठ प्रथा- समस्या मांडणारी मंडळे आजही कमी नाहीत! मात्र, हे करताना त्याच माझ्या मंडपाचा सामान्य जनतेला अडथळा निर्माण होणार नाही याचीही काळजी घेतली गेलीच पाहिजे ना! लोकमान्यांनी सुरू केलेला माझा उत्सव कधीकाळी कार्यकर्ता घडविणारा अखंड कारखाना होता! तो आज राहिलाय का? समाजकारण- राजकारणाचे बाळकडू मिळणारा माझ्या उत्सवाचा मंडप जुगारी अड्डा अन् गुंड- मवाल्यांच्या ताब्यात गेल्याचं दु:ख आहे रे!
मी- बाप्पा, सर्वच मंडळांमध्ये अशी परिस्थिती नाही बरं!

श्रीगणेशा- खरं आहे तेही! विपरित परिस्थितीतही संवेदनशील मनांंचे दर्शन आजही अनेक मंडळांकडून होते. माझ्या उत्सवाच्या काळातच नव्हे तर एरवीही अखंडपणे अनेक मंडळे कार्यरत असतात. आपत्तीच्या काळात कायम सहकार्यासाठी मंडळांंचे कार्यकर्ते पुढे असतात. आत्मिक प्रेरणांशी एकनिष्ठ राहून समाजधर्म पाळणारी कार्यकर्त्यांची ही फळी समाजाला भावनिक आधार देत आली असली तरी त्यात काही अनिष्ठ अपप्रवृत्तींनी शिरकाव केल्याने चांगलं काम करणार्‍या मंडळांची नाहक बदनामी होते याचेही वाईट वाटते रे! मंडळाच्या मंडपात मिळणारे जीवनाच्या वास्तवतेचे ज्ञान पुढे समाजकारण करताना उपयोगी पडायचे आणि त्याच जोरावरच राजकीय नेतृत्त्व उदयास यायचेच! मात्र, आज अशी परिस्थिती राहिली आहे का रे? गुंड- मवाल्यांंनी मंडळांचा ताबा घेतलाय! त्यातून खंडणीच वसूल केली जाते! पोलिस त्यांच काम करीत असली तरी त्यांनाही मर्यादा येऊ लागल्या असल्या तरी त्यांनीच आता दंडुका हाती घ्यावा आणि माझ्या उत्सवाचं सामाजिक भान जपावं! खरं तर माझा उत्सव हा कार्यकर्ता घडविणारा अखंड कारखानाच राहावा! तो गुंड- मवाल्यांच्या हाती जाऊ नये इतकंच!

(दुसर्‍या क्षणाला बाप्पाने हातातील चहाचा कप खाली ठेवला. भेटू उद्या, असं म्हणत त्याला शहराच्या मध्यवस्तीत दुचाकीवर लिप्ट देण्यासाठी विनंती केली. मीही ती मान्य केली. कापडबाजारातून पुढे आल्यानंतर ‘जय आनंद महावीर युवक मंडळ गणेशोत्सव मंडळ’, असा फलक दिसताच बाप्पानं गाडी थांबविण्यास सांगितली.)
श्रीगणेशा- जैन समाजातील तरुणांनी संघटीत होत कधीकाळी श्री महावीर युवक मंडळ या नावाने माझा सार्वजनिक उत्सव सुरू केला. स्व. सुवालाल गुंदेचा यांच्यासह अनेकजण यात सहभागी होते. पुढे जाऊन जय आनंद युवक मंडळाने स्वतंत्र उत्सव सुरू केला. त्यानंतर ही मंडळे एकत्र आली आणि त्यांनी ‘जय आनंद महावीर युवक मंडळ’ या नावाने माझा उत्सव सुरू केला. त्याला आज २३ वर्षे झालीत! विनोद गांधी, संतोष चोपडा यांच्या सारख्या अनेकांच्या योगदानातून कामकाज चालू असताना शैलेश मुनोत हा कायकर्ता घडला! आनंद मुथ्था, संतोष कासवा, राहुल सावदेकर, अनिल गांधी आदी या मंडळात आज सक्रिय आहेत. मुली- महिलांमध्ये आज असुरक्षीततेची भावना वाढीस लागली असताना या मंडळींनी ‘सुरक्षीत छकुली- सुरक्षीत बहिण’ ही टॅग लाईन घेत यावर्षीचा माझा उत्सव साजरा करायचं ठरवलं! या मंडळाचं अनुकरण बाकीची मंडळ करतील काय? आज मी त्यांच्याकडे पाहुणा म्हणून थांबतोय! उद्या भेटूच! (जय आनंद महावीर युवक मंडळाच्या स्टेजच्या आड होत बाप्पानं माझा निरोप घेतला आणि मी देखील माझ्या कामासाठी रवाना झालो.)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...