पारनेर | नगर सह्याद्री
माजी आमदार व शिवसेनेचे उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते विजय औटी यांनी आज मंगळवारी सकाळी पारनेरमध्ये तालुक्यातील निवडक शिवसेना पदाधिकार्यांची बैठक घेतली आणि लोकसभा निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांची भूमिका समजावून घेतली. या चर्चेचा तपशिल समजू शकला नाही. मात्र, सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि. १ मे रोजी पारनेरमध्ये काय भूमिका घ्यायची याबाबत घोषणा करु असे विजय औटी यांनी जाहीर केले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पारनेर शिवसेनेकडून कोणतीच भूमिका घेतली गेली नाही. निवडणुक जाहीर झाली आणि त्याचवेळी विजय औटी हे आजारी पडले. काही दिवस हॉस्पिटल आणि त्यानंतर घरी आराम केल्यानंतर त्यांना बरे वाटू लागले. लोकसभा निवडणुकीबाबत आपण आपली भूमिका जाहीर केली पाहिजे अशी मागणी कार्यकर्ते, पदाधिकार्यांकडून झाल्यानंतर औटी यांनी आज मंगळवारी निवडक पदाधिकार्यांची बैठक घेतली.
सर्वांची भूमिका समजावून घेत विजय औटी यांनी सर्वांच्या सहमतीचा निर्णय आपण दि. १ मे रोजी जाहीर करू आणि हाच आपणा सर्वांचा निर्णय असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, औटी यांची भूमिका नगर लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याने ते काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.