सुपा । नगर सहयाद्री-
पारनेर तालुक्यातील रांजणगाव मस्जिद परिसरातील खटकळी येथे मध्यरात्री चोरांनी धुडगुस घातला. शेतकरी कटूंबातील सदस्यांना मारहाण करत सशस्र दरोडा घालत अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वसंत गणपत जवक ( वय. ३६ वर्षे, रा. खटकळी, राजणगाव मस्जिद, ता. पारनेर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी: वसंत जवक कटूंबासह राजणगाव मस्जिद परिसरात वास्तव्यास आहे. जवक कुटुंबीय रात्री घरामध्ये झोपले असताना रात्री दीड वाजेच्या सुमारास सहा जणांनी त्यांच्या घराचा दरवाजा कटावणीने उघडून घरामध्ये प्रवेश केला. घरातील सर्वांना शस्त्राचा धाक दाखवून कपाटातील पाच हजारांची रोख रक्कम तसेच दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिणे काढून घेतले. दरोडेखोरांनी तक्रारदारासह कटूंबातील सदस्याना मारहाणही केली. एकूण अडीच लाख रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाले.
तालुक्यातील ग्रामीण भागात घडलेल्या दरोड्याच्या घटनेने मोठे भय निर्माण झाले असून पोलीसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मध्यरात्री वेळी दरोडे टाकत असतांना त्यांच्याकडे तलवारी, कोयते आणि लाकडी दांडके असल्याने मोकाट दरोडेखोरांना पोलिसांचा धाक शिल्लक राहिला नाही का अशीही चर्चा सुरू झाली आहे.