श्रीगोंदा । नगर सहयाद्री
तालुक्यातील लिंपणगाव येथील खासगी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शेतमालक बापू बाबा माने ( रा श्रीगोंदा, जि. अहमदनगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष माणिक भोंडवे, किरण भिकाजी भोंडवे, प्रवीण सोपान कूरुमकर, बापू लशमन कूरुमकर, सागर भिकाजी भोंडवे, प्रशांत संतोष भोंडवे, ताराबाई माणिक भोंडवे, मनीषा संतोष भोंडवे सर्व ( रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी: फिर्यादी बापू माने यांचे श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव शिवारातील गट नंबर २३६ मध्ये ६६ गुंठे क्षेत्र त्यांच्या मालकीचे आहे. सदर क्षेत्रावर दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी अतिक्रमण करत दोन ट्रॅक्टर ट्रॉली कांदे तसेच दोन मोकळ्या ट्रॉली उभा केले असल्याचे फिर्यादी बापू माने यांच्या निदर्शनास आले.
बापू माने यांनी सदर प्रकारची चौकशी केली असता नमूद जमिनी संदर्भात दावा करणाऱ्यांनीच हे अतिक्रमण केल्याचे समजले. बाप्पू माने यांनी दावेदार संतोष भोंडवे यांना विचारणा केली असता त्यांनी ती जागा माझी आहे. तुझा काय संबंध नाही, तू जर जमिनीमध्ये पाय ठेवला तर तुला मारून टाकेल अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पूर्वी देखील शेतीच्या वादातून प्राण घातक हल्ला
पूर्वी देखील शेतीची मोजणी करण्यासाठी गेले असता बाप्पू माने, उदय माने ,हनुमंत माने यांच्यावर येथील इसमांनी ट्रॅक्टर अंगावर घालत प्राण घातक हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.