पारनेर बाजार समितीमध्ये मोठा झोल | पणन संचालकांना सहा टक्के मलिदा! | रामदास भोसले, शंकर नगरे यांनी उघड केला घोटाळा
पारनेर | नगर सह्याद्री
शेतकर्यांची कामधेनू समजल्या जाणार्या आणि शेतीमालाशी संबंधित निर्णय होणार्या तालुका बाजार समितीच्या पारनेर येथील जागेत नगरपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता पत्र्याचे आठ व्यापारी गाळे बांधकाम सुरु करण्यात आले. नगरपंचायतीने या बांधकामास परवानगी नाकारल्यानंतर संचालकांना अंधारात ठेवत सभापती- उपसभापतींनी या बांधकामात मोठा झोल केल्याचा आरोप बाजार समितीचे संचालक व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले व संचालक शंकरराव नगरे यांनी केला आहे. आरसीसी कॉलम घेऊन पत्र्याचे शेड असणारे आठ गाळे बांधण्यासाठी सव्वा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून शेतकर्यांकडून वसुल करण्यात आलेल्या या सव्वा कोटीच्या रकमेतून पत्र्याचे आठ गाळे उभारण्याचा घाट घातला गेला आहे. बाजार समितीच्या सत्तेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांना शेतकर्यांना चुना लावण्याचा हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने झालाय याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, सदर कामास परवानगी मिळविण्यासाठी पणन संचालकांना सहा टक्के कमिशन द्यावे लागल्याचे सभापती तरटे यांनी बैठकीत सांगितले असून त्याचीही चौकशी करण्याची मागणी शंकर नगरे यांनी केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बाजार समितीने नगरपंचायतीकडे याबाबतची अधिक माहिती अशी की, बाजार समितीने नगरपंचायतीकडे आठ गाळे बांधकाम करण्यासाठी बांधकाम परवानगी मागणारे पत्र दि. ९ फेबुवारी २०२४ रोजी दिले. त्या पत्रात बाजार समितीने म्हटले आहे की, पारनेर बाजार समितीमध्ये सन २००० पासून कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार चालु आहेत. त्यावेळी आठ व्यापार्यांना पत्र्याचे गाळे बांधून देण्यात आले होते. त्यानुसार हे व्यापारी सदर गाळ्यांमधून व्यापार करत होते. मात्र, सदर व्यापार्यांनी बाजार समितीकडे सदर गाळे जुने झाले असल्याने नवीन व्यापारी गाळे बांधून द्यावेत अशी मागणी केली आहे. पणन संचालकांनी सदर गाळ्यांच्या बांधकामासाठी परवानगी दिली असून बांधकाम परवानगी मिळावी अशी विनंती या पत्राद्वारे नगरपंचायतीकडे करण्यात आली.
नगरपंचायतीने सदर पत्राची खातरजमा व तपासणी केल्यानंतर सदर बांधकामास परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र बाजार समितीला दि. १४ मार्च २०२४ रोजी पत्र लिहीले आणि बांधकाम परवानगी नाकारली. नगरपंचायतीने बांधकाम परवानगी नाकारली असतानाही बाजार समितीने सदर जागेत संबंधित ठेकेदाराकडून काम सुरू केले असल्याचे आता समोर आले आहे. ठेकेदाराकडून काही पदाधिकारी आणि संचालकांना ‘मलिदा’ पोहोच झाला असल्याची चर्चाही आता झडू लागली आहे. आठ व्यापारी गाळे आणि ते देखील पत्र्याचे असताना सव्वा कोटी रुपयांचा बांधकाम खर्च कसा असा प्रश्न माजी आमदार विजय औटी समर्थक संचालकांनी उपस्थित केला आहे.
शेतकर्यांच्या पैशाची अशी लूट होणार असेल तर अशा सत्तेत राहण्यात आम्हाला कोणतेच स्वारस्य नसल्याचे विजय औटी समर्थक संचालकांनी विजय औटी यांना समक्ष भेटून सांगितले असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, शेतकर्यांच्या हिताचा विचार करत जनतेने ही बाजार समिती माजी आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांच्या ताब्यात दिली होती. मात्र, लंके समर्थक पदाधिकारी आणि काही संचालकांनी या बांधकामाच्या निमित्ताने मोठा झोल केल्याने सदरबाबत सखोल चौकशी करावी आणि शेतकर्यांची लुट थांबवावी अशी मागणी केली आहे.
टाकळी ढोकेश्वरची महसूल जागा देण्यास प्रांताधिकार्यांनी दिला नकार!
बाजार समितीची टाकळी ढोकेश्वर येथे मोक्याच्या ठिकाणी कोट्यवधी रुपये किमतीची जागा होती. सदर जागा अशोक कटारिया यांनी विकत घेतली आणि बाजार समितीला पर्यायी जागा कल्याण- नगर हायवेवर एका डोंगराच्या कडेला दिली. मात्र, सदर जागा व्यावहारीकदृष्ट्या अयोग्य आणि चुकीची असल्याने तेथे बाजार समितीने काहीही काम केले नाही. याशिवाय त्या जागेकडे जाण्यासाठी रस्ता देखील नाही. बाजार समितीची निवडणूक झाल्यानंतर विद्यमान संचालक आणि पदाधिकार्यांनी टाकळी ढोकेश्वर येथे महसूल विभागाची मोक्याच्या ठिकाणी असणारी जमिन बाजार समितीसाठी मिळावी असा प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडे सादर केला. मोक्याची जागा मिळवून तेथे मोठा ‘बाजार’ मांडण्याची पदाधिकारी- संचालकांची ‘आयडीया’ प्रांताधिकार्यांनी हेरली आणि बाजार समितीला टाकळी ढोकेश्वर येथे स्वत:ची जागा असल्याने सदर महसूल विभागाची जागा देण्यास नकार दिला.
विजय औटी समर्थकांमध्ये ‘या’ झोलची मोठी नाराजी!
बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे नीलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी यांच्या गटाची सत्ता आहे. शेतकर्यांची कामधेनू टिकली पाहिजे आणि शेतकर्यांच्या हिताचा विचार झाला पाहिजे या हेतूने माजी आमदार विजय औटी यांनी सहकारातील निवडणूक म्हणून नीलेश लंके यांच्या सोबत युती करण्याचा निर्णय घेतला. पुढे पदाधिकारी निवडताना विजय औटी गटातील कोणालाही संधी मिळाली नाही. मात्र, तरी देखील औटी व त्यांच्या समर्थकांनी लंके समर्थक बाजार समिती पदाधिकार्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, बाजार समितीमध्ये पत्र्याचे आठ व्यापारी गाळे बांधकाम करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली जाणार असल्याचे समोर येताच विजय औटी समर्थक रामदास भोसले व शंकर नगरे यांनी नाराजी व्यक्त केली असून हा विषय तहकूब करत रद्द करण्याची मागणी केली आहे. शेतकर्यांशी प्रतारणा करणारी भूमिका आमचे नेते विजय औटी यांना कदापी मान्य होणार नसल्याचेही या दोघांनी म्हटले आहे.