अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात तुल्यबळ लढत झाल्याचे पहावयास मिळाले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत या मतदारसंघात चुरशीचा क्षण दिसून आला. आपापल्या नेत्याला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज शेवटच्या मिनिटापर्यंत मतदान केंद्रावर तळ ठोकून होती. दरम्यान, मतदान शांततेत पार पडल्यानंतर विखे समर्थकांना विजयाची खात्री असल्याचे तर लंके समर्थकांना विजयाची शाश्वती असल्याचे समर्थकांकडून बोलले जात आहे. अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ६३.७७ टक्के मतदान झाले तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात ६२ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अहमदनगर मतदारसंघात २५ तर शिर्डी मतदारसंघात २० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघातील ३ हजार ७३४ मतदान केंद्रावर सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे सोमवारी उन्हाची तीव्रता कमी होती. त्यामुळे मतदान केंद्रांवर सकाळपासून गर्दी होती.
शिर्डीत ६३ टक्के मतदान
शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण ६३.०३ टक्के मतदान झाले. अकोले ५९.८२, संगमनेर ६५.७७, शिर्डी ६३.७७, कोपरगाव ६१.१८, श्रीरामपूर ६४.०८, नेवासा ६३.२९ असा एकूण ६३.०३ टक्के मतदान शिर्डी लोकसभा मतदारसंघात झाले. या मतदारसंघात एकूण २० उमेदवार रिंगणात होते. तर सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब वाकचौरे, उत्कर्षा रुपवते यांच्यात तिरंगी लढत झाल्याचे पहावयास मिळाले.
दुपारी गर्दी कमी झाली. पाच वाजेपासून पुन्हा मतदान केंद्रावर गर्दी होती. काही मतदान केंद्रावर उशिरापर्यंत मतदान सुरु होते. दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी ४ जून रोजी अहमदनगर एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातील ३ हजार ७३४ मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे गोदामात जमा करण्यात आली आहेत. गोदामाला बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुस्लिम मतदारांचा वाढलेला टक्का दोघांच्याही पडणार पथ्यावर!
मतदान अवघ्या दोन दिवसांवर आलेले असताना संपूर्ण मतदारसंघात मुस्लिम मतदारांना भाजपा विरोधी मतदान करण्याचा फतवा काढण्यात आला असल्याची चर्चा बाहेर आली. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मुस्लिम बहुल मतदान केंद्रांमध्ये यापूर्वी कधीही न दिसणारा उत्साह मतदारांमध्ये दिसून आला. याचे व्हीडीओ सोशल मिडियावर बाहेर आलेे. त्यातून लंके समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत असतानाच दुसरीकडे लागलीच उलट परिस्थिती निर्माण झाली. हिंदू मतदारांमध्ये हे व्हीडीओ जाताच त्या मतदारांमध्ये हिंदुत्वाचे प्रेम उफाळून आले आणि त्यांच्याकडून लागलीच ‘जय श्रीराम’चा नारा देत मतदान केंद्रात सामुहीक रांगा लावल्या गेल्या. अर्थात, परस्परविरोधी भूमिकांमुळे मतदारांनी रांगा लावल्या असल्या तरी त्या दोघांनाही पुरकच राहिल्याने त्या दोघाही प्रमुख उमेदवारांच्या पथ्यावरच राहिल्याचे समोर आले.
विखे, लंके समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यातच खरी लढत पहावयास मिळाली. अमहदनगर लोकसभा मतदारसंघात विखे-लंके यांच्यासह २५ उमेदवार रिंगणात होते. मतदार प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर दोन्ही गटाच्या समर्थकांकडून मतदारसंघातील आकडेमोड करीत आपल्याच नेत्याचा विजय होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच आपला नेता विजयी होणार असल्याचा अंदाज बांधत डॉ. सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांकडून सुपा येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तर नीलेश लंके यांच्या समर्थकांकडून बुरूडगाव रोडवील लंके यांच्या संपर्क कार्यालयासमोर फटाके वाजून जल्लोष करण्यात आला. तर मुंकुंदनगरमध्ये लंके डोक्यावर उचलून घेत जल्लोष केला.
संभाव्य मताधिक्याचीसोयीस्कर आकडेमोड!
लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघात मतदानाची वेळ संपेपर्यंत हायहोल्टेज ड्रामा कायम राहिला. मतदारसंघातील उमेदवार असूनही पारनेरमध्ये न वाढलेला टक्का, पूर्ण मतदारसंघात मागील निवडणुकीपेक्षा फक्त एक टक्के जास्त झालेले मतदान आणि बहुतांश नेत्यांच्या तालुक्याच्या गावासह छोट्या-मोठ्या गावात झालेले चुरशीचे मतदान यातून मोठी चुरस दिसून आली. विखे आणि लंके या दोघांच्याही समर्थकांकडून सोयीस्करपणे कागदावर आकडेमोड रंगवली जात असून विजयाचे दावे केले जात आहेत.
पारनेरमध्ये विखे समर्थकांनी फोडला गावागावात घाम!
पारनेरमध्ये एक लाखांचे मताधिक्य घेणार आणि ही निवडणूक कमसे कम दोन लाख मतांनी जिंकणार असा दावा करणार्या नीलेश लंके यांना त्यांच्याच तालुक्यात मोठा विरोध झाल्याचे मतदानाच्या संपूर्ण दिवसभरात जाणवले. गावागावात लंके यांना वाढलेला हा विरोध नोंद घेण्यासारखाच राहिला. लंके यांना स्वत: गावागावात जाऊन माफीनामे करावे लागल्याने पुढची त्यांची वाटचाल अधिकच बिकट राहणार हे दिसून आले. विखे समर्थकांनी मतदानाच्या पहिल्या मिनिटापासूनच ‘डुप्लीकेट’ं मतदान रोखल्याचे आणि त्यास कडवा विरोध केल्याचे दिसून आले. त्यातून अनेक मतदान केंद्रांवर पोलिस एजंटांमध्ये घमासान देखील झाले.
गावागावातील नेतेमंडळींच्या नेतृत्वाचा कस लागलेली निवडणूक!
नेते मंडळी एका बाजूला आणि सामान्य जनता माझ्यासोबत असा दावा पहिल्या दिवसापासून नीलेश लंके यांच्याकडून केला जात होता. हा दावा त्यांनी मतदान संपेपर्यंत चालूच ठेवला होता. लंके आणि विखे या दोघांच्याही सोबत संपूर्ण मतदारसंघातील जी- जी प्रमुख नेतेमंडळी राहिली त्या नेत्यांच्या गावात कोणाला किती मतदान होते यावर त्या नेत्यांचा कस लागणार आहे. पुढारपण करणार्या नेत्यांनी ज्यांचा प्रचार केला त्या उमेदवाराला त्या गावात जास्तीचे मताधिक्य मिळाले तरच त्या स्थानिक नेतृत्वाबाबत उमेदवारामध्ये विश्वासार्हतेची भावना वाढीस लागणार आहे. मात्र, तसे झाले नाही तर त्या-त्या पुढार्याचं वस्त्रहरण होणार आणि त्यांना त्यांच्याच गावात येणार्या कोणत्याही निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांकडून कोणतीही किंमत राहणार नाही हे तितकेच खरे!
पारनेरमध्ये जिल्ह्याबाहेरची पोलिस यंत्रणा!
पारनेर मतदारसंघातील बहुतांश सर्वच गावांमध्ये मतदान केंद्र व परिसरात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून थेट ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांना नियुक्त करण्यात आले होते. स्थानिक पोलिसांवर स्थानिक उमेदवारासह त्याच्या समर्थकांकडून दबाव येऊ नये आणि त्यातून आरोप होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घेतल्याचे सांगण्यात आले.
लंकेंकडून छोटी तर विखेंकडून मोठी गावे!
नीलेश लंके यांनी मतदारसंघातील छोटी गावे- वाड्या आणि तेथील मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रीत केल्याचे जाणवले तर दुसरीकडे सुजय विखे यांच्याकडून मोठ्या गावांवर भर दिल्याचे जाणवले. त्यातूनच लंके यांच्या विजयाचे गणित मांडले जात आहे. याशिवाय ‘खतरे मे’चा नारा शेवटच्या दोन दिवसात जोरात दिला गेला आणि त्यातून काही समाजघटक जोडल्या गेल्याचे काही ठिकाणी दिसून आले.