श्रीगोंदा / नगर सह्याद्री
स्वच्छ भारत … स्वच्छ शहर ‘चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊन शहरात स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र श्रीगोंदा शहरातील साळवण देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एकीकडे रोगराईची धास्ती आणि शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात रोगराई पसरण्याची भीती नागरीकांमध्ये वाटत आहे. साळवन देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याची लेखी तक्रार श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनाला देण्यात आले.
याबाबत सागर कोथिंबिरे (शहर उपाध्यक्ष, रा.कॉ.) यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे की श्रीगोंदा साळवन देवी रोडवर मच्छी चिकन मार्केटच्या मागील बाजूस येथील दुकानदार चिकन आणि मच्छीचे अवशेष फेकून देत असल्याने रस्त्यावर बाजूला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी क्षेत्र निर्माण झाले असून या रस्त्याने जाणाऱ्या_ येणाऱ्या नागरिकांना व तेथे राहणाऱ्या नागरिकांना घाणीचा प्रादुर्भाव होऊन आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साळवण देवी मंदिराकडे जाणाऱ्या रोडवरील दयनीय अवस्था पाहून मंदिराचे पावित्र्यही धोक्यात येण्याची शक्यता स्थानिक नागरिक वर्तवत आहेत. तसेच याच रोडवरील पथदिवे बंद असल्याने तेही तात्काळ दुरुस्त करून घेण्यात यावेत असे निवेदनात म्हटले आहे.