जामखेड । नगर सहयाद्री:-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेले श्री क्षेत्र चौंडी येथील ऐतिहासिक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मंत्र्यांना दिले.
‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’निमित्त महाविकास आघाडी सरकारच्या काळात महापुरुषांशी संबधित ऐतिहासिक गावांमधील शाळा विकसित करण्यासाठी निधी देण्याची घोषणा तात्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती. मात्र यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेलं श्री क्षेत्र चौंडी गावातील जिल्हा परिषद शाळेचा सामावेश केला नव्हता. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन चौंडी येथील शाळेचा सामावेश करण्याची विंनती केली होती. त्यानुसार चौंडी येथील शाळेचा या योजनेत सामावेश करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती. त्यानंतर येथील शाळेच्या बांधकामासाठीही मंजुरी मिळाली आहे.
मात्र राज्य सरकारकडून दोन वर्ष होऊनही अद्याप जिल्हा परिषदेकडे निधी वर्ग करण्यात आलेला नाही. निधी उपलब्ध करण्याकरिता आमदार रोहित पवार यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला असून जिल्हा स्तरावरून देखील निधीसाठी मागणी प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. तरीही अद्याप निधी न मिळाल्याने शाळेचे बांधकाम सुरु झालेले नाही. त्यामुळे हा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्त्वाचा झेंडा देशभर फडकवला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ असलेलं चौंडी हे गाव आहे. महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या योजनेनुसार येथील शाळेसाठी तातडीने निधी वर्ग करण्यासाठी माझा प्रयत्न सुरु आहे. सरकार बदललं नसतं तर अद्यापपर्यंत शाळेचं कामही सुरु झालं असतं परंतु उशीरा का होईना निधी मिळेल आणि हे काम सुरु होईल, ही अपेक्षा!
-आमदार, रोहित पवार