अहमदनगर। नगर सहयाद्री:-
घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारास गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १ लाख १५ हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तुषार हबाजी भोसले ( वय वर्ष २३, रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड) कानिफ उध्दव काळे ( वय वर्ष २२, रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड ) असे अटक आरोपीचे नाव आहे.
दत्तात्रय आसाराम पवार ( वय वर्ष ५७, रा. जांब, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती, की अनोळखी व्यक्तींनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन, घरातील ५ लाख ७३ हजार ४०० रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यांना माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा तुषार भोसले व कानिफ उध्दव काळे यांनी केला असुन ते चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी मुठ्ठी चौक, नगर जामखेड रोड येथे येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकाला सूचना दिल्या.
त्यानुसार पथकाने सापळा लावत दोघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा १ लाख १५ हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नामे कानिफ उध्दव काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द अहमदनगर व बीड जिल्ह्यात दरोडा तयारी, दरोडा व खुन असे गंभीर स्वरुपाचे एकुण ३ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अंमलदार भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले, मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, संदीप दरंदले, विजय ठोंबरे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, विशाल तनपुरे, मेघराज कोल्हे व अरुण मोरे यांच्या पथकाने केली आहे.