जालना। नगर सहयाद्री-
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. मनोज जरांगे यांनी या पत्रकार परिषदेत सरकारकडे मोठी मागणी केली आहे. राज्यात काही ठिकाणी मुस्लीम समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.
लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण सोडले. राज्य शासनाने त्यांना इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे लेखी आश्वासन दिले. दरम्यान, राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगेही मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत.
जरांगे पाटील म्हणाले, माळी समाजाला व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिले असेल तर आम्हीदेखील तुम्हाला आमचे व्यवसाय दाखवतो. ते बागायती शेती करतात म्हणून त्यांना आरक्षण देण्यात आलं. आम्ही देखील शेतकरी मराठा म्हणून आमचा व्यवसाय दाखवतो. आम्हाला देखील व्यवसायाच्या आधारावर आरक्षण देण्यात यावे.
तसेच काही ठिकाणी मुस्लीम समाजाच्याही कुणबी सरकारी नोंदी निघाल्या आहेत. लिंगायत, मारवाडी, ब्राह्मण, लोहार या समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी निघाल्या आहेत. सरकारदरबारी हे कुणबी शेतकरी असल्याच्या नोंदी निघाल्या असतील तर मुस्लिमांनाही ओबीसीतूनच आरक्षण मिळायला हवं अशी मागणी जरांगे यांनी केली.