शिरूर । नगर सहयाद्री-
प्रेमी युगुलाने राहत्या घरात एकत्र गळफास घेतल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील शिक्रापूरमध्ये घडली आहे. हे दोघे एकाच दोरीने गळफास घेतलेले आढळले. प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे, ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. गणेश सखाराम कुडले (वय १९, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर जि. पुणे, मूळ, रा. मांदेडे, ता. मुळशी, जि. पुणे) व अनिषा संजय चांदेकर (वय १९, रा. अंडल, ता. मावळ, जि. पुणे) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी: मूळचे मुळशीचे असणारे कुडले कटूंब शिक्रापूरापूर मधील करंजेनगरमध्ये वास्तव्यास होते. कटूंबातील सदस्य गावी गेल्याचा फायदा घेत मुलगा गणेश कुडले प्रेयसी अनिषा चांदेकर हिला घरी घेऊन आला होता. ४ जून रोजी सायंकाळच्या सुमारास वडील सखाराम कुडले यांनी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला फोन करून गणेशकडे फोन देण्यास सांगितले.
शेजारील व्यक्ती कुडले यांच्या घरात गेले असता यांना गणेश व त्याच्या प्रेयसीने गळफास घेतल्याचे दिसून आले. याप्रकरणी सखाराम श्रीपती कुडले (वय १९, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. मांदेडे, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस करत आहे.
सुसाईड नोटमधून मांडली व्यथा
घटनास्थळावर एक सुसाईड नोट मिळून आली. ‘आम्ही आमच्या स्वेच्छेने करत असून यात आमच्या कुटुंबाचा काही संबंध नाही, आमच्यामुळे ज्यांना त्रास होत होता त्यांना त्रास होणार नाही’ असा मजकूर सुसाईड नोटमध्ये लिहिलेला आहे.