अहमदनगर। नगर सहयाद्री-
राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच अवकाळी पाऊस होत असल्याने आतापर्यंत लाखोंचे नुकसान झाले आहे. तर मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाची हजेरी पहायला मिळत आहे. वादळी वार्यासह झालेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेतातील पीक उध्वस्त केले आहे तर श्रीगोंदा तालुक्यातील येवती गावात वीज कोसळल्याने माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. आता पुन्हा भारतीय हवामान खात्याने नगर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभगाच्या माहितीनुसार, राज्यात बदलत्या हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. कोकणातील काही भागात उष्ण व दमट हवामान राहणार आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तसेच राज्यात पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने असून जळगाव, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.