सारिपाट । शिवाजी शिर्के
बा विठ्ठला, आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुझ्या दारी पंधरा लाख वारकर्यांची मांदियाळी आली. मी त्यातीलच एक असं समज! पंधरा लाख वारकर्यांचं गार्हाणं एकलंस तसं माझं गार्हाणं तू गांभिर्याने घेशील ही भाबडी आशा आहे. खरंतर एकनाथभाईंनी राज्यातील जनतेच्या वतीने साकडं घातल्यानंतर काही शिल्लक राहिलं नाही असं वाटतं! तरीही तुझ्याशी हितगुत करण्याचा हा प्रयत्न!
बा विठ्ठला, घरात आई-वडिल असताना आणि त्यांच्यातच पांडुरंग शोधण्याची गरज असताना लाखो वारकरी तुझ्या भेटीसाठी येत असतात! बहुतेकांना तुझ्या भेटीची आस असते. काही हौशेनौशे असतात हा भाग वेगळा! मात्र, घरातल्या आई- वडिल रुपी तीर्थाची सेवा किती जण करतात हे एकदा तू विचारण्याचं धाडस करावं! तुझ्या चरणी लीन होणार्यांपासून ते पंढरपुरी दाखल होत असताना सेल्फी घेत त्याच स्टेटस ठेवणार्यांपर्यंत सार्यांनाच तू हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. बा विठ्ठला, मागील दोन आठवड्यात दोन वेगवेगळ्या दशक्रिया विधींना जाण्याचा योग आला. पहिला होता एका शिक्षकाच्या वडिलांचा आणि दुसरा होता एका प्रख्यात महाराजांच्या आईचा! दोघांचेही कुटुंंब माहितीतील! दशक्रिया विधीतील महाराजांची प्रवचन सेवा संपल्यानंतर श्रद्धांजलीचा पाऊस सुरू झाला. गुरुजींनी त्यांच्या वडिलांची कशी सेवा केली आणि त्यांनी शिक्षकीपेशातून पिढी कशी घडवली याचा उहापोह करताना स्पर्धा लागावी अशी भाषणे! मी जरा मागच्या बाजूला बसलो होतो.
‘बाप जिवंत असताना त्याचा तपास केला नाही, जमिन वाटपात सरस- नीरस वाटणी आली म्हणून बापाला लाथा घालणारा हा मास्तर!’ असं वाक्य स्थानिक गावकरी त्याच्या शेजारी बसलेल्यासोबत पुटपुटला! बा विठ्ठला…. समजला ना तुला! महाराजांच्या आईच्या दशक्रिया विधीत हेच घडलं! बापाची जागा आईने घेतली! आई आजारी असताना त्या आईच्या सेवेला महाराजांना वेळ नव्हता. आईला शेजारी असणार्या भावकीतील घरातून डबा यायचा! रात्री झोपलेली आई दुसर्या दिवशी बाहेर का येईना म्हणून शेजार्याला शंका आणि दुपारी चार वाजता त्यांनी दार तोडल्यावर समजलं, आईने या जगाचा निरोप घेतलाय! महाराजांना सांगावा धाडला गेला! सहा- सात तासांनी महाराज आले. धाय मोकलून रडले! रडणार्या महाराजाला पाहून गाव अक्षरक्ष: शिव्यांची लाखोली वाहत राहिले! दशक्रिया विधीत महाराजांचं कौतुक करणार्या बाहेरच्या भक्तांना गावकर्यांनी दहावा झाल्यावर वास्तव सांगितलं असता त्यातील बहुतेकांनी महाराजांना न भेटता त्यांच्या गावचा रस्ता धरला होता.
बा विठ्ठला, समाजमन घडविणार्या दोन घटकांबद्दलची ही प्रातिनिधीक उदाहरणे आहेत. किती मास्तर आणि किती महाराज आई- वडिलांची सेवा करत असतील हे त्यांचे त्यांनाच माहिती! वास्तवाचा विचार केला तर त्यांना समाज प्रबोधन करण्याचा नैतिक अधिकार आहे का रे? बा, विठ्ठला खरं तर घरातच पंढरपूर असताना त्या खर्याखुर्या पंढरपुरातील विठ्ठल- रुक्मीणीच्या डोळ्यात अश्रू आणणार्या अशा अवलादी तू वेशीवरच थोपविल्या पाहिजेत! आदर्श म्हणून समाज ज्यांच्याकडे पाहतो, त्या आदर्शांनीच जर कलंक लावण्याचे काम केले तर सामान्यांनी कोणाचा आदर्श घ्यायचा! आई- वडिल हेच तुमचं वैकुंठ आणि तेच तुमचं पंढरी हे सांगण्याचं काम पुन्हा एकदा बा विठ्ठला तू करावंस इतकंच!
पंढरीची वारी आहे माझे घरी!!
वारी वारी जन्म मरणा ते वारी!!
बा विठ्ठला, ज्यांनी आई वडील गमावलेत, त्यांना तूच विचार त्यांच्या मनातील आजच्या भावना काय आहेत आणि त्यांचं उत्तर तूच सांग तुझ्या दर्शनासाठी आलेल्यांना! ज्यांनी आई- वडिल गमावलेत ते आज त्यांना शोधताहेत आणि ज्यांच्याकडे आहे त्यांच्यातील अनेकजण रोज त्यांची पुजा करताहेत आणि त्यांनाच आदर्श मानताहेत! मात्र, आजही काही औलादी त्यांच्याकडे ढुंकणही पाहत नसतील तर त्यांची माथी काय हाणायचे याचा निर्णय आता तरी तू घ्यावास! संस्कारीत पिढी तयार होण्यासाठी बा विठ्ठला तुझ्याच पुढाकाराची गरज आहे रे! बा विठ्ठला एक मात्र खरे की, सारासार विचार सुटला की विवेकालाही आपोआपच रजा दिली जाते आणि एकदा विवेकही सुटला की अध:पतनाला वेळ लागत नाही.
बा विठ्ठला, सामान्य माणसाला जगण्यासाठी लागणारी ऊर्जा देणारा आषाढीचा उत्सव झाला एकदाचा! पदोपदी येणार्या अडचणींवर मात करण्यासाठी लागणारी शक्ती याच आषाढीतील तुझ्या भेटीतून सामान्य माणसाला मिळत आली. निराशा आणि हतबलता, दु:ख आणि वेदना, अपयश आणि दैन्य या सार्या गोष्टी येऊनही उभे राहण्याची ताकद याच तुझ्या भेटीतून त्याला मिळत गेली. एका अर्थाने त्याच्या आयुष्याला व्यापून टाकणार्या अनिश्चिततेवर मात करण्यासाठी आवश्यक असणारे बळ त्याला बा विठ्ठला तूच त्याला देत आलास.
बा विठ्ठला, ही अनिश्चितता आता किती अंगांनी सामान्य माणसाला भेडसावतेय याची कधीतरी तू माहिती घेणार आहेस की नाही? तुझ्या भेटीस येणार्यांच्या मनातील प्रश्नांचा, समस्यांचा ठाव तू कधी घेणार आहेस की नाही? त्यांचे प्रश्न तुला कधीतरी अस्वस्थ करीत नाही का? त्यांची परिस्थिती किती बिकट होत असेल या कल्पनेनेसुद्धा संवेदनशील मनाच्या माणसाच्या डोळ्यात पाणी येते. असेच पाणी तुझ्या डोळ्यात येते का रे? प्रत्येक ठिकाणी सामान्य माणूस नाडला जातो आहे. हर एक ठिकाणी त्याची अडवणूक होत आहे. देणारे असतात म्हणून घेणारे घेतात, असे याचे एक समर्थनही केले जाते. परंतु मुळात देण्यासारखी परिस्थिती कोण निर्माण करते,याचाही विचार व्हायलाच हवा असं तुला नाही का रे वाटत. मग, त्याचाही बंदोबस्तही व्हायलाच हवा ना!
सामान्य माणसाच्या सतत होत असणार्या घुसमटीमुळेच त्याला तुझ्या आषाढी उत्सवाचा एक आधार वाटतो. काहीकाळ तरी त्याला वास्तवापासून दूर जाण्याची मोकळीक मिळते. बा विठ्ठला, सारासार विचार सुटला की विवेकालाही आपोआपच रजा दिली जाते आणि एकदा विवेकही सुटला की अध:पतनाला वेळ लागत नाही हे वास्तव सत्य मान्यच करावे लागेल.
बा विठ्ठला, आमची सुखदु:खे बाजूला ठेवून आम्ही तुझ्या भेटीला येत असतो! दरवर्षी चंद्रभागेत स्नान करुन आम्ही तुझ्या भेटील येतो! सोबत राज्याचा मुख्यमंत्री देखील असतो बरं! सार्यांचं एकच मागणं, सुखी ठेव! गरीब-श्रीमंत असा भेदभाव न ठेवता सार्यांची उपासना, प्रार्थना तू गोड मानतोस. तुझे आमच्याकडे काहीही मागणे नसते. तू येतोस ते आपल्या भक्तांचे संकट निवारण्यासाठी. घराघरात समृद्धी येण्यासाठी. तुझा महिमा आम्ही तुझ्याच उत्सवात तुझ्यासमोर मनोभावे गातो. तुझी पूजा-अर्चा करतो. तू आपल्या भक्तांवर कृपेचा वरदहस्त ठेवतोस. अन्, तुझ्या भक्तांना त्रास देणार्यांचे निर्दालनही करतो, असा तुझा अपार महिमा. आमची दु:खे, व्यथा-वेदना तुला माहितीही आहेत. जनता जनार्दनाचा छळ करणार्यांना कठोर शासनही करतो, असा आमचा विश्वास आहे. बा विठ्ठला, आमच्या व्यथा तुला सांगतानाही आम्हाला बरे वाटत नाही, पण करणार काय? तुला आमची दु:खे सांगितल्यावर तूच आम्हाला सुख देशील, असे आम्हाला वाटते.
बा विठ्ठला, आम्ही आमच्या नेत्यांना सांगून सांगून दमलो. पण, आम्हा जनता जनार्दनाचे ही नेतेमंडळी काही ऐकत नाही. लक्षही देत नाहीत. फक्त आश्वासनाचे पाणी तेवढे पाजते. आपण जनतेच्या बळावरच सत्तेचे सिंहासन मिळवले, याचे भान या सत्ताधार्यांना राहिलेले नाही. दुष्टांचे निर्दालन करण्यापेक्षा जनता जनार्दनाला छळणार्या काळाबाजार- वाल्यांना, जनतेच्या शत्रूंनाच हे सरकार संरक्षण देते आहे. महागाईच्या कराल वणव्यात तुझे सामान्य भक्तगण अक्षरश: होरपळून निघत आहेत. सरकार हे जनतेचे नोकर म्हटले जाते, पण तेच आता मालक झाले. खर्या मालकांना धमक्या द्यायला लागले. आम्हाला पाच वर्षांसाठी निवडून दिल्यामुळे आम्ही कसाही कारभार करू, जनतेने निमूटपणे महागाई, भ्रष्टाचार, भाववाढ सहन करायलाच हवी. आमच्यासाठी -देशासाठी त्याग करायलाच हवा, असे आमचे मायबाप सरकार सांगते आहे. अशा स्थितीत हे विठ्ठला, तुला शरण येण्याशिवाय आमच्याकडे काही पर्यायच राहिलेला नाही.
बा विठ्ठला, माजलेल्या भ्रष्टासुराचे तू निर्दालन कर. सर्वसामान्य गोरगरिबांना छळणार्या भ्रष्टाचार्यांना, लाचखोरांना धडा शिकव. त्यांना पाठीशी घालणार्या सरकारलाही सुबुद्धी दे. लोकशाहीत जनतेने ज्यांना निवडून दिले, सत्ता दिली त्यांनी जनतेच्या आशा-आकांक्षानुसारच कारभार करायला हवा. जनता जनार्दनाला सुखी ठेवायला हवे. हा तुझ्या गणसत्तेचा दस्तूर होता. त्याचा विसर आमच्या राज्यकर्त्यांना, संधिसाधू राजकारण्यांना पडलाय! महागाईच्या कराल वणव्यात होरपळणार्या देशातल्या दरिद्री आणि तळागाळातल्या मुलाबाळांना, श्रमिकांना दोन वेळचे अन्न मिळत असले तरी त्यांच्या मुलभूत प्रश्नांचे काय? लक्षावधी आदिवासींना पावसाळ्यात कंदमुळे खाऊन आणि पाण्याचे घोट पिऊन भुकेची आग शमवावी लागते हे वास्तव सत्य तुलाही मान्यच करावे लागेल.
भ्रष्टाचाराच्या राक्षसाला गाडण्यासाठी जनतेने एकजुटीने अनेक आंदोलने केल्याचे तू देखील पाहिलेस! त्याचवेळी आमचे लोकप्रतिनिधी संसदेच्या सर्वाभौमत्वाचा गजर करीत राहिले. भ्रष्टाचार हा देशाला लागलेला कर्करोग आहे, अशी कबुली देणारे आमचे सरकार भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी भ्रष्टाचार्यांवर शस्त्र उगारायला मात्र तयार होत नाहीत. ज्यांनी जनतेच्या पालकत्वाची भूमिका घ्यायची, त्यांनीच लाखो कोटी रुपये घशात घातल्याचेही समोर आलेय. भ्रष्टाचार हा आमच्या देशातला शिष्टाचार झाला. लाचखोरांना प्रशासनाची सरकारची काही दहशत वाटत नाही. जनतेच्या पैशावर दरमहा वेतन घेणार्या नोकरशाहीतले लाचखोरीला सोकावलेले काही अधिकारी आणि कर्मचारी जनतेकडूनच सक्तीने लाच उकळतात. काही राजकारणी आणि प्रशासनातल्या अधिकार्यांनाही भस्म्या रोग लागल्यानेच त्याची खाबूगिरी काही कमी होत नाही, संपत नाही. खून मारामार्या, बलात्कार, दरोडे, खंडण्या असे गंभीर गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल झालेले काही नेते कायद्यातल्या पळवाटांचा लाभ घेत लोकसभा, विधानसभेवर निवडून जातात. त्यातले काही मंत्रीही होतात. बा विठ्ठला, हे सारे चालू असताना तू कर कठेवर ठेवून वर्षानुवर्षे उभा आहेस! तू असा डोळे झाकून का बसला आहेस? तुझ्या या भक्तांच्या दुर्दशेने तुला दयेचा पाझर का फुटत नाही? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने आमच्या सार्यांच्याच मनात येत आहेत.
बा विठ्ठला, बरंच काही बोललोय पण दुसरा पर्यायच नाही आमच्याकडं. आमच्यासाठी एवढं तुला करावच लागेल. तुझ्या दिव्य तेजाच्या प्रकाशाने तू आम्हाला छळणार्या शत्रूंचा नायनाट कर आणि राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे. बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे. जनता जनार्दनाला सुख मिळू दे. एवढे मागणी तू पूर्ण कर! बा विठ्ठला आमच्यावर कृपा कर!