अहमदनगर। नगर सहयाद्री-
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने पत्नीवर चाकुने वार करत हत्या केल्याची घटना सिध्दार्थनगरमध्ये घडली आहे. रेवती उर्फ राणी संदीप सोनवणे (वय ३५) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत रेवतीचे वडील बाळू केशव साठे (वय ६६ रा. बुऱ्हानगर, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संदीप उर्फ कुंदन राधाजी सोनवणे असे या पतीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी: संदीप व रेवती यांच्या विवाहाला १८ वर्षे पूर्ण झाली असून त्यांना दोन मुली आहेत. दरम्यान संदीप नेहमी रेवतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत होता. रेवती याबाबतची तक्रार वडिलांकडे करायची व ते तिला माहेरी घेऊन येत होते. ६ जून रोजी रात्री संदीपने रेवतीसह त्याच्या दोन्ही मुलींना मारहाण करून भर पावसात घराबाहेर काढून दिले होते. त्यानंतर वडील साठे यांनी त्यांना घरी बुऱ्हाणनगर येथे आणले.
त्यानंतर संदीप सासरी बुऱ्हाणनगरला आला मारहाण केल्याची चूक कबूल करून पुन्हा असे करणार नाही, त्यांना माझ्यासोबत पाठवा, अशी विनवणी केली. साठे यांनी देखील त्याला समज दिली. दरम्यान सोमवारी (१७ जून) सकाळी साडेआठ वाजता संदीप याने सासरे साठे यांची दुचाकी घेतली व तो पत्नी रेवतीसोबत घरी सिध्दार्थनगर येथे आला.
दुसऱ्या दिवशी मंगळवारी (१८ जून) दुपारी १२ वाजता मुलीला भेटण्यासाठी व दुचाकी आणण्यासाठी साठी मुलीच्या घरी आले असता त्यांना मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनंतर सदर प्रकरण उघडकीस आले असून पती संदीप सोनवणे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.