अहमदनगर / नगर सह्याद्री : पत्त्याचा क्लब सुरु असल्याबाबत माहिती दिल्याच्या रागातून वकिलावर चॉपरने हल्ला केला. नगर-पुणे महामार्गावर केडगावमध्ये ही घटना घडली. हर्षद मनोज चावला (वय २८ वर्षे, रा. गंगा उदयान मिस्कीन नगर, सावेडी) असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
प्रशांत पवार, असद गफार शेख, कुमार कचरे (सर्व रा. अहमदनगर, पूर्ण पत्ता माहित नाही) असे आरोपींची नावे आहेत. ही घटना २५ डिसेंबर २०२३ रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. हर्षद चावला यांनी कोतवालीत याबाबत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की केडगावमधील वैष्णवराज हॉटेल येथे पत्याचा क्लब सुरु असल्याबाबत डायल ११२ ला कॉल केल्याचा राग मनात धरुन वरील तीनही आरोपींनी नगर पुणे रोडवर केडगाव येथे रस्त्यात अडवून शिवीगाळ केली.
आरोपी प्रशांत पवार याने चॉपरने फिर्यादीचे डोक्यावर वार केला. परंतु त्यांनी तो हाताने अडवल्याने हातावर जखम झाली. यावेळी आरोपी किरण काळे व संजय झिंजे यांचे नाव घेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे याला मारुन टाका असा दम देत होते. यावेळी फिर्यादी हर्षद चावला हे तेथून पळाले असता प्रशांत पवार याने पुन्हा वार केला असे फिर्यादीत म्हटले आहे.