अहमदनगर | नगर सह्याद्री
लोकसभेच्या अहमदनगर व शिर्डी मतदारसंघासाठी गुरूवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत २३ जणांनी ४२ अर्ज नेले. त्यात महायुतीचे उमेदवारी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी अभिजीत दिवटे यांनी दोन अर्ज नेले आहेत. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही.
गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीचे रणांगण तापले आले. महायुतीकडून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीकडून आमदार नीलेश लंके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरपासून विखे-लंके यांच्या वाकयुद्ध पहावयास मिळत आहे. तर दोघांनीही मतदारसंघ पिंजून काढला आहे. २५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज स्विकारलेे जाणार आहेत. विखे-लंके
हे दोन्ही उमेदवार प्रमुख नेत्यांच्या उपस्थितती २३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. तसेच यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी दोन्ही समर्थकांकडून चालविली आहे.