अकोले | नगर सह्याद्री
उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये सहा जण बुडाल्याची घटना ताजी असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यात प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या तरुणांना शोधण्यासाठी गेलेल्या पथकाची बोट उलटून तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. आणखी तिघे बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.
बुधवारी दि २२ मे रोजी दुपारी १.३० ते २ दरम्यान सागर पोपट जेडगुले व अर्जुन बबन जेडगुले याच्यासह १० ते ११ जण मूरघास काढून झाल्यावर उन्हाच्या तीव्रतेने दिलासा घेण्यासाठी प्रवरा नदीपात्रातील मनोहरपूर फाटा येथील केटीवेअर बंधार्याजवळ पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण पाण्यात बुडाले. त्यांनतर २ युवकांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले होते. शोध घेण्यासाठी बोटीत पथकातील चार जणांसह एक स्थानिक तरुण बसला होता. पथकाकडून रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता.
यातील सागर पोपट जेडगुले (वय २५, धुळवाडी, ता. सिन्नर) याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता, तर अर्जुन बबन जेडगुले (वय १८, रा. पेमगिरी, ता. संगमनेर) याचा शोध सुरु असतांना याचदरम्यान, पाण्याच्या प्रवाहामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दल पथकाची बोट उलटली. या दुर्घटनेत एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर इतर तिघांचा शोध सुरू आहे. प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
एसडीआरएफचा पीएसआयचा मृत्यू
एसडीआरएफ चा जवानांची जी बोट बुडाली त्यात पीएसआय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा, चालक वैभव सुनील वाघ यांचा मृत्यू झाला आहे. तसेच कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार आणि कॉन्स्टेबल अशोक हिम्मतराव पवार यांच्यावर उपचार सुरु आहे. बोटीत असणारा स्थानिक राहिवाशी गणेश मधुकर देशमुख याचा शोध सुरु आहे.
मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी ः आ. पवार
एसडीआरएफची बोट उलटल्यानंतर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, उजनी धरणात बोट बुडाल्याने बेपत्ता झालेल्या पाच जणांचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुखःद आहे. तर नदीत बुडालेल्याचा शोध घेताना प्रवरा नदीत बोट उलटून एसडीआरएफच्या बचाव पथकातील तीन जवानांचा मृत्यू झाल्याची बातमीही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. यातील सर्व मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!
एसडीआरएफ जवानांची बोट नेमकी कशामुळे बुडाली?
प्रवरा नदीत एसडीआरएफ जवानांची बोट बुडाल्याचा थरार सुगाव गावाचे पोलीस पाटील राजेंद्र शिंदे यांनी आपल्या डोळ्यादेखत पाहिला. घटनेबाबत माहिती देताना राजेंद्र शिंदे म्हणाले, नदीपात्रात बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ चे पथक गावात आले होते. एसडीआरएफ टीमच्या दोन बोटी तरुणांचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरल्या. पण यातील एक बोट पाण्याच्या भोवर्यात सापडली. काही क्षणातच ही बोट उलटली. दुसरी बोट पाण्यात चकरा मारत होती. बुडालेल्या बोटीतील जवान पोहण्याचा प्रयत्न करीत होते. पण पाण्याच्या भोवर्यात अडकल्यामुळे त्यांना वर येता आलं नाही. दुसरी बोट मदतीसाठी जाण्याआधीच ते बुडाले अशी माहिती पोलीस पाटील राजेंद्र शिंदे यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच आ. थोरात घटनास्थळी
प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोन तरुणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या एसडीआरएफची बोट उलटून जवानांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. याबाबत काँग्रेसचे नेेते बाळासाहेब थोरात यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबतचे काही फोटो त्यांनी एक्स वर ट्विट केले आहेत.
सुगांव बुद्रुक शिवारातील प्रवरा नदीपात्रात दोन मुले बुडाली. त्यापैकी एक जणाचा मृतदेह सापडला असून एक जण बेपत्ता आहे. त्या बेपत्ता असलेल्या मुलाच्या शोधासाठी आलेल्या एसडीआरएफची बोट उलटून झालेल्या अपघातात एका जवानाचा मृत्यू झाला असून तीन जवान अद्याप बेपत्ता आहेत. तर एका जवानाला वाचवण्यात यश आले आहे. तातडीने घटनास्थळी जाऊन बचाव कार्याची पाहणी केली.
तीन जवान व एक स्थानिक नागरिक अद्यापही बेपत्ता असून त्यांच्या शोधासाठी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या जवानाला, तरुणांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत बेपत्ता जवान सुखरुप मिळावेत ही ईश्वराकडे प्रार्थना असे ट्विटमध्ये आ. थोरात यांनी म्हटले आहे.
नागरिकांची परिसरात मोठी गर्दी
सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदी पात्रातील पाझर तलावामधून पडणार्या पाण्याचा दाब अधिक असून तेथे भोवरा असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही दुदैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान घटनास्थळी आमदार डॉ किरण लहामटे,माजी आमदार वैभवराव पिचड यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक नागरिकांसह अकोले तालुक्यातील नागरिकांनी परिसरात मोठी गर्दी केली आहे.