अहमदनगर | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीसाठी ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी निवड झालेल्या अधिकारी कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले. न्यू आर्टस् महाविद्यालयात मतमोजणीची ही रंगीत तालिम पार पडली. न्यू आर्टस महाविद्यालयाच्या छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सभागृहात दोन सत्रांमध्ये हे प्रशिक्षण पार पडले. ईव्हीएम मशिनवरील मतमोजणीसाठी १०२ पर्यवेक्षक आणि १०८ मदतनीस नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी १०२ सुक्ष्म निरीक्षक राहणार आहेत.
अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही मतदारसंघांसाठी याच प्रमाणे अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सुरूवात पोस्टल मतमोजणीने होणार आहे. जिल्ह्यात सुमारे दहा हजारांपेक्षा अधिक पोस्टल मतदान आहे. सैन्य दलात कार्यरत जवानांचीही संख्या जास्त आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघात सुमारे ७ हजारांपेक्षा जास्त सैन्य दलातीलजवानांची संख्या आहे. शिर्डी मतदार संघात अडीच हजार जवानांची संख्या आहे. या सर्वांना मतपत्रिका पाठविण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या मतदारांना घरातून मतदानाची सुविधा दिली होती. हे मतदानही मतपत्रिकेवर झालेले आहे. दुसर्या जिल्ह्यात मतदान प्रक्रियेसाठी कर्तव्यावर असलेले अधिकारी-कर्मचार्यांसाठी ही मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे मतपत्रिकांची संख्या वाढली आहे.
अहमदनगर लोकसभा मतदार संघातील पोस्टल मतपत्रिकांची संख्या जास्त असल्याने १७ पर्यवेक्षक, ३४ मदतनीस आणि १७ सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिर्डीसाठी १५ पर्यवेक्षक, ३० मदतनीस आणि १५ सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलसाठी एक पर्यवेक्षक, एक मदतनीस, एक शिपाई आणि एक सूक्ष्म निरीक्षक अशा चौघांची नियुक्ती राहणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी, तहसीलदार आणि इतर कर्मचारी राहणार आहेत.
एका उमेदवारासाठी ३० सेकंद
प्रत्येक ईव्हीएम मशिनवर प्रत्येक उमेदवाराला किती मते मिळाले. याची मोजणी करावी लागते. उमेदवारासमोरील बटण दाबल्यानंतर ३० सेकंदाने आवाज येतो. अहमदनगर लोकसभा मतदार संघात २५ उमेदवार असल्याने शिर्डी लोकसभेच्या तुलनेत अहमदनगर मतदार संघाच्या निकालाला जास्त वेळ लागणार आहे.
मतमोजणीसाठी ८४ टेबल
लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीसाठी १४ टेबल राहणार आहेत. त्यानुसार लोकसभेच्या एका मतदार संघासाठी ८४ टेबल राहणार आहेत. तसेच पोस्टल मतपत्रिका मोजण्यासाठी १४ टेबल असतील.