Politics News: महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. बारामती शहरात लावलेल्या बॅनरवरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे फोटो वगळण्यात आले आहेत, आणि त्याचप्रमाणे, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये ‘मुख्यमंत्री’ हा शब्द वापरण्यात आलेला नाही, यामुळे महायुतीत संघर्ष वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर, शिवसेनेने बारामतीत एकनाथ गणेश फेस्टिवलचे आयोजन केले. याच्या उद्घाटनाला अजित पवार आले नाही. यामुळे त्यांच्या फोटोवर काळे कापड टाकले गेले. शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी हे कृत्य केल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांना कार्यक्रमाला येण्यासाठी तीन ते चार वेळा विनंती केली, परंतु ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही.
बारामतीत एका फ्लेक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो असले तरी अजित पवारांचा फोटो समाविष्ट केलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यातील एक होर्डिंग देखील अजित पवारांच्या फोटोशिवाय लावण्यात आले आहे, यामुळे बारामतीतील बॅनर चर्चेचा विषय बनले आहे.