टिळक भोस यांच्या तक्रारीवरून लागली होती चौकशी
श्रीगोंदा । नगर सहयाद्री
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती मद्ये सचिव दिलीप डेबरे यांनी संगनमताने कांदा व्यापारी व काही शेतकरी यांना हाताशी धरून कांदा अनुदान घोटाळा केला असल्याची तक्रार टिळक भोस यांनी तक्रार दाखल केली होती. संशयित ४९५ शेतकऱ्यांचे प्रस्ताव तपासणी केली असता त्यापैकी जवळपास ३०२ शेतकरी यांचे प्रस्ताव पूर्णतः बोगस असून 1 ,88,47,524 रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे झाले आहे.
विशेष पथकाने श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कागदपत्राची तपासणी केली असता त्यात अनेक गंभीर बाबी समोर आल्या असून संस्थेचे सचिव दिलीप डेबरे यांच्या सुचनेनुसार यात सहभागी असलेल्या इतर सर्व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक गणेश पूरी यांनी दिले आहेत.
सचिव दिलीप डेबरे यांनी दैनंदिन कांदा आवक-जावक संदर्भात चुकीची माहिती कळवली आहे. फेब्रुवारी व मार्च २०२३ मधील कांदा खरेदीच्या मापाडी खतावणीमधील नोंदी आणि अनुदानासाठी सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये ३५ हजार क्विंटलची तफावत आढळून आली आहे. संस्थेचे सचिव दिलीप डेबरे यांनी अनुदानाचे प्रस्ताव सादर करताना त्याची पूर्व पडताळणी न करता ते प्रस्ताव शासनाला सादर केले आहेत.
बोगस कांदा अनुदान प्रस्ताव सादर करण्यासाठी तयार केलेल्या बोगस कांदा पट्टया तयार करण्यात सचिव दिलीप डेबरे व संबंधित कर्मचारी वैयक्तिक व सामूहिकरित्या जबाबदार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सभापती अतुल लोखंडे यांना दिले आहेत.
कांदा अनुदान घोटाळा व्यापकच
दिनांक 27 व 28फेब्रुवारी 2023 रोजी श्रीगोंदा बाजार समिती मद्ये 6 लाख 60हजार कांदा गोनी आवक झाली अशी माहिती मिळाली त्यावर चौकशी केली असता 1370 ट्रन कांदा दोन दिवसात मार्केट ला येऊच शकत नाही. ही गोष्ट खोलात जाऊन तपासली असता मोठा भ्रष्टाचार झाल्याचे लक्षात आले. त्यावर तक्रार देऊन चौकशी लावली होती. त्यात जवळपास 1 88 47 524 रुपये (एक कोटी अठ्यांशी लाख सत्तेचालीस हजार पाचशे चोवीस) रुपये भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होत आहे.अजून खोलात जाऊन तपास केल्यास अनेक व्यापारी,आडते, मापडी,दिवाणजी, शेतकरी सुद्धा या प्रकरणात सापडतील.
पालकमंत्री विखे पाटील यांनी राजीनामा द्यावा
या सर्वांवर तत्काळ गुन्हे दाखल व्हावेत यासाठी लवकरच आंदोलन करणार आहे. नगर जिल्ह्यात सरकारच्या आशीर्वादाने मोठा कांदा अनुदान घोटाळा झाला आहे.पालकमंत्री विखे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे.
– टिळक भोस