नगर-दौंड रेल्वेमार्गावरील सारोळा कासार स्टेशन जवळ अशा चोरीच्या घटना या आधीही घडल्या होत्या.
अहमदनगर । नगर सह्याद्री
मालगाडीच्या डब्यांचे लॉकर तोडून साखरेची १२३ पोते लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नगर-दौंड कॉर्डलाईन रेल्वे मार्गावर सारोळा कासार (ता. नगर) रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. चोरटयांनी साखरेचे पोते रेल्वेमार्गालगत असलेल्या पिकामध्ये लपवून ठेवले होते.
नगर-दौंड रेल्वेमार्गावरील सारोळा कासार स्टेशन जवळ अशा चोरीच्या घटना या आधीही घडल्या होत्या. त्यामुळे आता या परिसरात रेल्वे पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असतात. अशाच प्रकारे मालगाडीचा एक डबा चोरट्यांनी फोडून त्यातील साखरेची पोती चोरून नेल्याचे निदर्शनास आले होते. गस्त घालणारे हेड कॉन्स्टेबल बापू घोडके आणि सुनील मराठे यांनी दौंड लोहमार्ग पोलिसांना याची माहिती दिली. त्यामुळे नगर व दौंड येथून लोहमार्ग पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. अधिकार्यांनीही तेथे धाव घेतली.
सदर घटनेचा तपास करत असताना रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे परिसराबाहेरील असलेल्या शेतात साखरेची पोती काळ्या ताडपत्रीमध्ये झाकून ठेवलेल्या स्थितीत पोलिसांना आढळून आले. ही पोती या ठिकाणी आलीच कशी याबाबत चौकशी पोलिसांकडून सुरु आहे. सदर हस्तगत केलेल्या साखरेची किंमत एक लाख 90 हजार 650 रूपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
COMMENTS