राजेंद्र बाजीराव दिवेकर (वय ५६, रा. जांभुळवाडी) असे खून झालेल्या पीएमपी चालकाचे नाव आहे.
पुणे । नगर सह्याद्री
उसण्या पैशांवरुन वाद झाल्याने पीएमपी चालकाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घडलेला प्रकार शनिवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आला.
राजेंद्र बाजीराव दिवेकर (वय ५६, रा. जांभुळवाडी) असे खून झालेल्या पीएमपी चालकाचे नाव आहे. सोमनाथ अशोक कुंभार (वय ३०, रा. जांभुळवाडी) आणि रोहित दिलीप पाटेकर (वय २०, रा. धनकवडी) यांना याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दिवेकर व आरोपी दारू पित बसले होते. त्यादरम्यान त्यांच्यामध्ये वाद झाला. यावेळी सोमनाथ आणि रोहित यांनी दिवेकर यांचा धारदार शस्त्राने खून केला. पती रात्रभर घरी न आल्याने पत्नी शोध घेत असताना त्यांचा खून झाल्याचे समजले. याप्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड करत आहेत.
COMMENTS