आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी निसर्गाचे अनेक सहस्य उलगडले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा गौरव पुरस्काराचे उत्साहात वितरण
अहमदनगर | नगर सह्याद्री
येथील मराठवाडा मित्र मंडळातर्फे हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त दरवर्षी स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा गौरव पुरस्कार दिला जातो. मराठवाडयात जन्म घेतलेल्या व आपल्या कार्याचा ठसा मराठवाडयाबाहेर उमटविणार्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यंदा स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा गौरव पुरस्कार पंजाबराव डख यांना आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी निसर्गाचे अनेक सहस्य उलगडले.
डॉ. सर्जेराव निमसे अध्यक्षस्थानी होते. मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, सचिन कंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया, स्वागताध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया, कार्याध्यक्ष सदाशिव मोहिते, सचिव उमाकांत जांभळे, निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे, सचिव वनश्री मोरे-गुणवरे, प्रमोद काकडे, सुभाष वाखारे, मारूती कदम उपस्थित होते.
यावेळी पंजाबराव डख यांची डॉ. सुधा कांकरिया यांनी प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीतुन डख यांनी निसर्गाचे अनेक रहस्य उलगडून दाखवले. पाऊस पडण्यापूर्वी निसर्ग वेगवेगळया प्रकारे सिग्नल देत असतो. त्यामध्ये आकाशाचे रंग, चिमण्या इतर पक्षांच्या हालचाली, विमानाच्या आवाजात झालेला बदल, चिलटे किंवा डासात झालेली वृद्धी अशा अनेक बाबी डख यांनी उदाहरणासह स्पष्ट केल्या. हवामानाचा अचूक अंदाज कसा बांधता येतो, डख यांचा अंदाज सहसा चुकत नाही त्यामागचे कारण, भविष्यात भारताला व जगाला कुठल्या संकटाला सामोरे जावे लागेल, या सर्व प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. वयाच्या १४ व्या वर्षापासुन त्यांना निसर्गाचे हे वरदान लाभले आहे व त्यानंतर त्यांनी शास्त्रशुध्द अभ्यासही केला आहे.
हजारो शेतकरी त्यांच्या सांगण्यावरून पेरणी करतात. खरोखर श्री डख हे शेतकर्यांचे कैवारी, देवदुत ठरत आहेत. डख यांच्या मुलाखतीतुन त्यांनी वीज पडणे’ बाबत अनेक रहस्य उलगडून दाखवले. विजेपासुन स्वत:चे संरक्षण करण्यासाठी मोबाईल टॉवर पासून दूर रहावे तसेच मोबाईलचा नेट/वायफाय लगेच बंद करणे, झाडाखाली न थांबणे वगैरे वगैरे महत्वपुर्ण सुचना दिल्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा गौरव पुरस्कारा विषयी बोलत असतांना त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विषयी आदर व्यक्त केला. व सदर पुरस्कार प्रदान झाल्यामुळे अजून स्फूर्तीने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असे म्हणाले.
देशभक्तीपर नृत्य तसेच पर्यावरण पुरक नृत्याने सर्वांचे मन जिंकले. आमदार संग्राम जगताप म्हणाले की मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास आपण जगावला आहे. आज स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाचा पुरस्कार डख यांना प्रदान करण्याचे भाग्य मला लाभले मी स्वत:ला धन्य समजतो. अचुक हवामानाचा अंदाज सांगणारे डख शेतकर्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांचे कार्य महान आहे. आजचा कार्यक्रम सर्वार्थाने अर्थपूर्ण, भावपुर्ण व उत्तम साजरा झाला मी मराठवाडा मित्र मंडळाचे अभिनंदन करतो. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचे भाषण केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. सर्जेराव निमसे यांनी विविध मुद्दे मांडले. ते म्हणाले मी स्वत: स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास केला.
अत्यंत वंदनीय असे हे व्यक्तीमत्व होते. ते आज त्यांच्या कार्यामुळे अमर आहेत. डख यांच्या विषयी म्हणाले की मी आता रिटायर झाल्यानंतर शेती करतो व डख यांचे हवामान अंदाज मला नेहमी उपयोगी पडतात. पर्यावरणाविषयी बोलतांना ते म्हणाले की सध्या पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. शिवाय घातक विषारी वायूचे प्रमाण ही वाढत आहे याचा लगेच बंदोबस्त नाही केला तर मानवजात या सृष्टी वरून नाहिशी होण्याची शयता शास्त्रज्ञ व्यक्त करतात. तरी सर्वांनी या विषयी जागृत होऊन उपाय योजना करायला हव्यात असे ते म्हणाले. सुरूवातीस डॉ. प्रकाश कांकरिया यांनी हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास विदित केला, डॉ. सुधा कांकरिया यांनी पुरस्काराविषयी माहिती देऊन स्वागत केले.
सदर प्रसंगी पर्यावरण क्षेत्रात कार्य करणार्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अनिल लोखंडे, तुकाराम अडसूळ, लक्ष्मीकांत ईडलवार, बाळासाहेब बोडखे तसेच जिल्हा परिषद अहमदनगर आदर्श शिक्षक राम वाकचौरे, साधना क्षीरसागर यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. व शेवटी प्रमोद काकडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन नंदकुमार देशपांडे यांनी केले.
COMMENTS