मिलीभगत मोडून काढण्याचा शब्द विखे पाटलांनी पाळला | थोरात-तनपुरे-लंके-फाळकेंचं नक्की काय चाललंय? मोरया रे / शिवाजी शिर्के - साखर झोपेत असतान...
मिलीभगत मोडून काढण्याचा शब्द विखे पाटलांनी पाळला | थोरात-तनपुरे-लंके-फाळकेंचं नक्की काय चाललंय?
मोरया रे / शिवाजी शिर्के -
साखर झोपेत असतानाच बाजूला कोणीतरी मला जागं करत असल्याचं जाणवलं! पाहतो तर साक्षात बाप्पा! मी जरासा गोंधळलोच! डोळे चोळत उठून बसलो!
मी- बाप्पा आलास! वेलकम टू हिस्टोरीकल नगर सीटी!
श्रीगणेशा- हिस्टोरीकल असं म्हणून कितीवेळा इमोशनल करणार आहेस? त्याच्या बाहेर पडून विकासाचं वास्तववादी चित्र निर्माण होणार आहे की नाही? आणि हो... स्वागत कसलं करतोय! मागच्या वर्षी स्वागत करताना मी काय सांगितलं होतं आणि निरोप देताना विखे पाटलांनी काय म्हटलं होतं हा आपल्यातील संवाद आठवतोय का?
मी- बाप्पा, मला तर काहीच आठवत नाही!
श्रीगणेशा- सोयीचं आठवतं का?
मी- तसं नाही रे!
श्रीगणेशा- अरे बाबा, मागच्या वर्षी माझं दणक्यात स्वागत करण्याचे आदेश कोणी दिले होते?
मी- ओह... एकनाथ शिंदे साहेबांनी! त्यावेळी ते नुकतेच मुख्यमंत्री झाले होते!
श्रीगणेशा- होय... त्यावेळीच मी सांगितलं होतं की, सुप्रिम कोर्टातील त्यांच्या लढाईचा निकाल लागणार नाही! झालंय ना तसंच! सुप्रिम कोर्टाचा आदेश होऊनही तुमच्या विधानसभेच्या सभापतींना त्यावर निर्णय घ्यावा असं वाटलं नाही! कालच्या बातम्या पाहिल्या असतीलच तू! वर्ष सरलं ना यातच! सुप्रिम कोर्टाने नाराजी व्यक्त केली! तरीही एकनाथ भाई आणि त्यांच्या सहकार्यांबाबत निर्णय झाला का? नाहीच ना! आणि हो, त्या ईडी आणि सीबीआयच्या धाडी संपल्यात का? त्या संपणार नाहीत हे मी मागच्या वर्षीच सांगितलं होतं! नगरमध्ये माझं जोरदार स्वागत झालं बरं का! रस्त्यांची अवस्था मागच्यापेक्षा बर्यापैकी सुधारलेली दिसली!
मी- बाप्पा, विखे पाटलांनी मागच्यावेळीच तुला शब्द दिला होता!
श्रीगणेशा- अरे हो... बरं झालं तू विखे पाटलांबद्दल बोललास! मागच्या वर्षी निरोप देताना मी तुझ्याच ऑफीसमध्ये त्यांच्याशी हितगुज केली होती. त्यांच्याशी बोलताना मी म्हणालो होतो, ङ्गनामदार साहेब, माझ्या भक्तांच्या काही व्यथा आहेत! या व्यथांना तुमच्याकडून नक्कीच न्याय मिळेल असं वाटते! नगर शहरातील खड्ड्यांचा अनेक वर्षांचा प्रश्न आहे. रस्त्यात खड्डा आहे की खड्डयात रस्ता हा प्रश्न आता मलाच पडलाय! जिल्ह्याचं मुख्यालय म्हणून नगर शहर विकासित झालं पाहिजे! अर्थात खासदार सुजय पाटलांनी नगरच्या वैभवात भर घालणारा उड्डाणपुल केलाय! रिंगरोडचं काम चालू आहे. हे सारं जरी झालं असलं तरी नगर शहर हे जिल्ह्याचं मुख्यालय वाटायला तयार नाही. नामदार साहेब, आपण राज्यात हेवीवेट नेते आहात! आपल्या शब्दाला सातत्याने किंमत मिळते! आपण नव्या सरकारमध्ये मंत्री झाल्यापासूनच नव्हे तर आधीपासूनच आपण शहरात लक्ष घालत आला आहात! पण, आता नगरकरांना विकास नक्की काय असतो आणि तो कोण करू शकतो हे आपणच दाखवून देऊ शकता! शहराचे आमदार आणि या भागाचे खासदार दोघेही हातात हात घालून काम करत असले तरी आता त्यात तुम्हाला अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. जिल्ह्यातील वाळू तस्करीसह अनेक अवैध धंद्यांनी डोकं वर काढलं आहे. अवैध धंद्यावाल्यांचं स्तोम जिल्ह्याच्या काही भागात काही लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांच्या संगमनमताने वाढलंय! साहेब, एका तालुक्यात मुलींना पळवून नेण्याचे मोठे रॅकेट चालू आहे. मुलीचा बाप न्याय मागायला गेल्यास पोलिस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दोघे मिळून मुलीच्या बापाला ङ्गपोरीचं त्याच पोराबरोबर लग्न लावून देफ, असा सल्ला देतात! साहेब, हे सारं तुमच्याच जिल्ह्यात घडतंय! जिल्ह्यातील प्रश्नांना तडीस नेताना मनमाड रस्त्याचा प्रश्न, शिर्डीतील प्रश्न, दुष्काळी भागातील प्रश्न आपणाकडून निश्चितपणे पूर्ण व्हावेत अशी भाबड्या भक्तांची अपेक्षा आहे. नगर शहरात ठेकेदारांच्या संगनमताने निकृष्ट कामे होतात, त्याकडेही लक्ष द्यावं लागेल! निरोप घेण्याआधी मला तुमच्याकडून हे सारे प्रश्न सुटतील आणि पुढच्या वर्षी येताना ङ्गहे सारे प्रश्न मिटलेतफ असं सांगत माझं स्वागत तुम्ही करालफ असं मी बोललो होतो.
मी- बाप्पा, आठवतंय आम्हा नगरकरांना तुमच्या दोघांमधील हे हितगुुज! बाप्पा गणेशा, आमची सुखदु:खे बाजूला ठेवून आम्ही तुझे स्वागत करतो. तू ओंकार स्वरुप, विश्वरूप, तू निराकार आणि निर्गुणही.. सर्व शास्त्रांचा तूच अधिष्ठाता, सर्व मंगलकार्याचा प्रारंभ तुझ्याच पूजेने करण्याची आमची परंपरा. देवाधिदेव संकटात सापडल्यावर तुलाच शरण जातात असा तुझा महिमा. शरणागत होऊन आम्ही सर्वजण तुला मनोभावे वंदन करतो. दरवर्षी तू येतोस, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न ठेवता भक्तांची उपासना, पूजा-अर्चा गोड मानतोस. विश्वाचा तूच निर्माता आणि प्रतिपालक. त्यामुळे तुझे आमच्याकडे काहीही मागणे नसते. तू येतोस ते आपल्या भक्तांचे संकट निवारण्यासाठी. घराघरात समृद्धी येण्यासाठी. तुझा महिमा आम्ही तुझ्याच उत्सवात तुझ्यासमोर मनोभावे गातो. तुझी पूजा-अर्चा करतो. तू आपल्या भक्तांवर कृपेचा वरदहस्त ठेवतोस. तू तुझ्या भक्तांना त्रास देणार्यांचे निर्दालनही करतो, असा तुझा अपार महिमा. आमची दु:खे, व्यथा-वेदना तुला माहितीही आहेत. जनता जनार्दनाचा छळ करणार्यांना तू कठोर शासनही करतो, असा आमचा विश्वास आहे.
श्रीगणेशा- काही तालुक्यांमध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या टोळ्यांची दळभद्री युती संपुष्टात आणण्यास विखे पाटलांना यश आलेलं दिसतंय! ती गरजच होती. गेल्या वर्षभरात बरेच काही घडलंय! काही चांगल्या गोष्टी घडल्यात तर काही वाईट! खरं तर, सामान्य माणसाच्या सतत होत असणार्या घुसमटीमुळेच त्याला माझ्या या दहा दिवसांच्या उत्सवाचा एक आधार वाटतो. काहीकाळ तरी त्याला वास्तवापासून दूर जाण्याची मोकळीक मिळत असते. खरं तर, यानिमित्ताने मलाही तुझ्याशी संवाद साधण्याची आणि नगरकरांच्या मनातील व्यथा जाणून घेण्याची इच्छा होत असते! म्हणूनच तर सारे नगरकर माझ्या स्वागताला सज्ज असताना आज पहिल्याच दिवशी भल्या पहाटे तुझी भेट घेतोय! महसूलमंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरातांना त्यांच्याच तालुक्यातील टंचाई आढावा बैठकीत मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले! मुख्य सचिव, महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांशी बैठका करणार्या थोरातांना त्यांच्याच तालुक्यातील आढावा बैठकीत नायब तहसीलदारांनी हजेरी लावली! तहसीलदार- प्रांताधिकारी कोणाच्या आदेशाने गायब झाले होते हे सांगणे न लगे! तिकडे प्राजक्त तनपुरे म्हणालेत की हे सरकार गतीमान नसून गतीमंद आहे! नगरच्या राष्ट्रवादी भवनात फाळकेंचे अजितदादांवरील प्रेम लपून राहिलेले नाही! तिकडे राज्यात विखेंच्या सोबत पारनेरचे नीलेश लंके सत्तेत असले तरी या दोघांचे सूर अद्याप जुळायला तयार नाही! नक्की काय आहेत या सार्या भानगडी! शरद पवार हेच माझे दैवत म्हणणारे तुमच्या जिल्ह्यातील दोन आमदार कसे काय गेले अजित पवारांसोबत? हे सारं मी विस्तारानं सांगणार आहे तुला! स्वागताचा जल्लोष सुरू होत असताना मी निघतोय! आपण उद्या भेटूच! अरे हो... मुस्लिम बांधवांना खरं तर धन्यवाद दिले पाहिजेत! माझ्या निरोपाच्या दिवशीच त्यांचा ईद ए मिलाद सण आला असताना त्यांनी तो दुसर्या दिवशी साजरा करण्याचं ठरवलंय! त्यांच्या या भूमिकेचं तुम्ही सर्वांनी स्वागतच केलंय! मी देखील त्यांना धन्यवाद देतो!
उद्या भेटू, असं म्हणत दुसर्या क्षणाला बाप्पा गायब झाला!
COMMENTS