जालना | नगर सह्याद्री जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. अनेक शहरे आणि जिल्ह्यात आज बंद पुकारलेला आह...
जालना | नगर सह्याद्री
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. अनेक शहरे आणि जिल्ह्यात आज बंद पुकारलेला आहे. व्यापाऱ्यांनी तर दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला आहे. तर अनेक जिल्ह्यात एसटी सेवा आजही बंद ठेवण्यात आली आहे.
त्यामुळे नागरिकांही याची झळ सोसावी लागत आहे. राज्यभर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. औरंगाबाद, सातारा आणि बारामतीत मराठी संघटनांनी बंद पुकारला आहे. सकल मराठा संघटनेने पुण्यातील खेड, चाकण आणि आळंदीत बंद पुकारला आहे. खेड तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आल्या आहेत.
सोलापूरच्या बार्शीतही बंदची हाक देण्यात आली आहे. बार्शीत मराठा संघटनांकडून आज सकाळी निदर्शने करण्यात येणार आहेत. नाशिकच्या लासलगावसह 42 गावातील दुकाने बंद राहणार आहेत. याशिवाय लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत.
बंदचे पडसाद सकाळ पासून जाणवायला सुरुवात झालीय, नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. धुळ्यातून औरंगाबादला जाणाऱ्या बसेस आजही बंदच राहिल्याने ग्रामस्थांची मोठी कुचंबना झाली आहे. त्यातच अनेक खासगी वाहन चालकांनीही आपली वाहने बंद ठेवल्याने अनेकांना प्रवास करण्यात अडचणी येत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनूरी, वसमत आणि हिंगोली या तिन्ही आगारातील 160 बसेस आजही ठप्प आहेत. तिसऱ्या दिवशी ही तिन्ही आगारातील बस सेवा संपूर्ण बंद असल्याने प्रवाशांची हेळसांड होत आहे. मराठा समाजाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान या आंदोलनामुळे सध्या संमिश्र स्थिती आहे.
COMMENTS