पुणे / नगर सह्याद्री : ऑगस्ट महिनाही बहुतांश ठिकाणी कोरडाच गेला. खरिपाची पिके यंदा आलीच नाहीत. परंतु आता आलेल्या अंदाजानुसार पुन्हा एकदा चि...
पुणे / नगर सह्याद्री : ऑगस्ट महिनाही बहुतांश ठिकाणी कोरडाच गेला. खरिपाची पिके यंदा आलीच नाहीत. परंतु आता आलेल्या अंदाजानुसार पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. सप्टेंबर महिना देखील आता कोरडाच जाईल की काय अशी चिंता निर्माण झाली आहे.
गुरुवारी 'आयएमडी'तर्फे सप्टेंबरमधील पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला. नवीन अंदाजानुसार आता सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. अशी स्थिती राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
पावसात पडलेल्या मोठ्या खंडामुळे १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीतील पर्जन्यमानाचे आकडेही बदलले आहेत. राज्यात मान्सून हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे. 'आयएमडी'ने गुरुवारी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, 'सप्टेंबरमध्ये देशात सरासरीच्या ९१ ते १०९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मात्र, ईशान्य, पूर्व भारताचा काही भाग आणि हिमालयाच्या पायथ्याकडील भाग वगळता इतरत्र पाऊस सरासरीपेक्षा कमी राहील. महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता ३५ ते ५५ टक्के आहे. त्याचप्रमाणे कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याचेही 'आयएमडी'ने म्हटले आहे.
त्यामुळे या हिट चा थेट परिणाम पिकांवर होईल यात शंका नाही. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र होणार? 'आयएमडी'च्या विस्तारित हवामान अंदाजामध्ये मान्सून सप्टेंबरच्या सुरुवातीला सक्रिय होईल असे सांगितले आहे.
या अंदाजानुसार ४ सप्टेंबरला वायव्य बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यापुढील ४८ तासांत म्हणजे ६ सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. हे क्षेत्र पश्चिम-वायव्येला सरकून मध्य भारतात पावसाचे प्रमाण वाढू शकते.
COMMENTS