नवी दिल्ली / नगर सह्याद्री राज्यात आणि देशात सध्या अनेक राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. महाराष्ट्रात सुरु असणारे राजकीय डावपेच सर्वश्रुत ...
नवी दिल्ली / नगर सह्याद्री
राज्यात आणि देशात सध्या अनेक राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. महाराष्ट्रात सुरु असणारे राजकीय डावपेच सर्वश्रुत आहेत. त्यातच आता मराठा आरक्षणासाठी जालन्यात उपोषण सुरु असल्याने त्याची धग देखील सत्ताधाऱ्यांना बसत आहे.
दुसरीकडे प्रत्येक पक्षाच्या गोटात प्रचंड हालचाली घडत आहेत. याचे कारण म्हणजे तोंडावर आलेल्या लोकसभेच्या निवडणुका. या सगळ्या घडामोडी समांतर घडत असताना देशाची राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. देशभरातील विरोधी पक्षांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली.
इंडिया आघाडीची मुंबईत बैठक पार पडली. त्यानंतर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत रात्री घडामोडींना वेग आला आहे. याचे कारण म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी महत्त्वाची बैठक पार पडत आहे.
या बैठकीसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे हजर आहेत. अनेक मोठे नेतेही यात सामील झाले आहेत. या बैठकीत आगामी विशेष अधिवेशनाबाबत रणनीती ठरणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर या पाच दिवसांसाठी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक हे विधेयक आणू शकते असा अंदाज आहे.
याबाबतचा अध्यादेश समोर आल्यानंतरच याबाबत सविस्तर माहिती समजू शकेल. पण हा कायदा मंजूर झाला तर डिसेंबर महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. याच अनुशंघाने आता राजकीय घडामोडी वाढू लागल्या आहेत.
COMMENTS