सोलापूर / नगर सहयाद्री सध्या राज्यातील स्थिती कशी आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राजकीय वातावरण तर तापलेलेच आहे. परंतु आरक्षणाच्या मुद्...
सोलापूर / नगर सहयाद्री
सध्या राज्यातील स्थिती कशी आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राजकीय वातावरण तर तापलेलेच आहे. परंतु आरक्षणाच्या मुद्द्यावरून जनता संतप्त आहे. रोजच कुठे ना कुठे मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे.
दरम्यान आता याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून या आंदोलकांनी थेट सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून जाहीर निषेध नोंदवला आहे.
त्यानंतर सदर आंदोलकास कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. अधिक माहिती अशी : सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी ते रेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. विखे पाटील आल्याची कुणकुण लागताच धनगर समाजातील आंदोलकांनी रेस्ट हाऊसकडे धाव घेतली.
मंत्र्यांना निवेदन द्यायचं आहे. आम्हाला त्यांची भेट हवीय असं आंदोलकांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनीही त्यांचं म्हणणं विखे पाटील यांच्याकडे पोहोचवलं. तेव्हा विखे पाटील यांनी आंदोलकांना येण्याची परवानगी दिली. हे कार्यकर्ते रेस्ट हाऊसमध्ये आल्यानंतर आंदोलक शेखर बंगाळे यांनी विखे पाटील यांना निवेदन दिलं.
ते निवेदन वाचत असतानाच अचानक बंगाळे यांनी खिशात हात घातला आणि खिशातून पुडी काढत विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला. त्यामुळे विखे पाटील यांच्या अंगावर संपूर्ण हळद पसरली. या प्रकाराने विखे पाटील काहीसे गोंधळले.
हा प्रकार घडताच तिथेच असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंगाळे यांना जोरदार मारहाण सुरू केली. बंगाळे यांना खाली पाडून त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवले. यावेळी विखे पाटील यांनी अरे सोडून द्या त्याला. मारू नका, असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी बंगाळे याला बाहेर ओढत नेलं.
COMMENTS