संगमनेर | नगर सह्याद्री श्री गणेश सहकारी साखर कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी घडू लागल्या आहेत, मात्र पद्मश्री विठ्ठलराव ...
संगमनेर | नगर सह्याद्री
श्री गणेश सहकारी साखर कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी घडू लागल्या आहेत, मात्र पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याने जिल्हा बँक, साखर आयुक्त यांना पत्र देऊन गणेशच्या मार्गात काटे निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे. सत्तेचा गैरवापर करून गणेश कारखाना हडप करण्याचा विखे पाटील कारखान्याचा उद्योग सुरू आहे. अशा दहशतीला सहकार खात्याने बळी पडू नये आणि गणेश कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे अशी विनंती श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना केली.
राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन संचालक मंडळाने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याने गणेश कारखान्याच्या विरोधात जे गैरप्रकार सुरू केले आहे. त्यांचा पाढाच वाचला, यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. सोबत श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय दंडवते, ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब डांगे, संपत हिंगे, गंगाधर डांगे, महेंद्र गोर्डे, नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, विष्णुपंत शेळके, अनिल गाढवे, मधुकर सातव, अनिल टिळेकर, आलेश कापसे आदी उपस्थित होते.दंडवते म्हणाले, गणेश सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या हेतूने सध्या प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हा बँकेने राजकारण केले
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मोठा इतिहास आहे, जिल्ह्यातील सहकार वाचविण्यासाठी बँकेने कायम पुढाकार घेतलेला आहे. मात्र आज जिल्हा बँक राजकारणाचा भाग झाली आहे. एका बाजूने गणेश कारखान्याला कर्ज मंजूर करायचे आणि दुसरीकडून अटींचा खोडा घालायचा आणि गणेशला कर्ज द्यायचे नाही, असा स्पष्ट हेतू बँकेचा दिसून येत आहे. हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून सुरु आहे? हे न समजायला जनता दुधखुळी नाही, असा आरोप डॉ. एकनाथ गोंदकर यांनी केला.
गणेश चे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे हे अत्यंत चांगल्या भावनेने गणेशच्या पाठीशी उभे आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील गणेश सुरू करण्यासाठी आम्ही पाठीशी राहू असा शब्द निवडणूक झाल्यावर दिला होता, मात्र तो शब्द फिरवत गणेशच्या मार्गात काटे निर्माण करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणाला जिल्हा बँकेने मंजुरी दिली, त्यानंतर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने बँकेला पत्र देऊन गणेशला कर्ज देऊ नये असे सांगितले. गणेश कारखान्याकडून अव्वाच्या सव्वा रकमेची मागणी केली. नुकतेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याने गणेश कारखान्याला पत्र देऊन पन्नास कोटी रुपये घेणे असल्याचे कळविले.
हे सर्व आकडे खोटे असून, गणेश कारखान्याला कर्ज मिळू नये यासाठी चाललेला हा आटापिटा आहे. सत्तेचा गैरवापर करून गणेश कारखान्याची अडवणूक सुरू आहे. ज्येष्ठ नेते डॉ. गोंदकर म्हणाले, गणेश कारखाना सुरू व्हावा ही सभासदांची इच्छा आहेच, मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्री गणेश, साईबाबा आणि नारायण गिरी महाराजांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. गणेश च्या निवडणुकीत आम्ही विखे पाटील यांच्या दहशतीचे झाकण उडवले. अजूनही ते जर सुधारणार नसतील आणि गणेशच्या मार्गात अडथळे निर्माण करत असतील तर सभासद व शेतकरी येत्या निवडणुकीत हे सर्व लक्षात ठेवतील. दहा वर्षात यांनी गणेशचे वाटोळे केले, कारखान्याच्या ठेवी सुद्धा मोडून टाकल्या, कराराच्या अटींचे पालन केले नाही आणि आता सुद्धा गणेशच्या मार्गात अडचणी निर्माण करत आहे.
COMMENTS