पोलीसांनी आरोपी मुलगा अमितविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
नागपूर । नगर सह्याद्री
नागपूरमधील शक्तिमातानगर परिसरामध्ये पोटच्या मुलानेच वडिलांच्या पाठीवर लोखंडी रॉडने वार करत वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नंदनवन पोलिस ठाण्यात या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घडलेला प्रकार शनिवारी रात्री आठच्या दरम्यान घडला.
कृष्णराव सदाशिव रायपूरकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मुलगा अमित भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारी म्हणून कार्यरत आहे. अमितला दारूचे व्यसन असल्याने तो घरी वाद घालत असे. अमित आणि त्याच्या वडिलांमध्ये शनिवारी सायंकाळी दारूच्या कारणावरून वाद झाल्याने काही वेळातच वादाचे रूपांतर भांडणात झाले. अमितने वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने वडिलांनी त्याला टोकले व मला शिवीगाळ करू नको, असे म्हटले. यावरून अमित संतापला व त्याने घरातील लोखंडी रॉडने स्वतःच्या वडिलांच्या पाठीवर जोरदार वार केला.
याप्रकरणी कृष्णराव गंभीर जखमी झाल्याने ते बेशुद्ध पडले. शेजारील व्यक्तीने त्यांना तातडीने एका खासगी दवाखान्यात नेले. परंतु रुग्णालयात दाखल करण्या पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. आरोपी अमित यांच्या पत्नीने घडलेल्या प्रकाराची कल्पना पोलिसांना दिली. पोलीसांनी आरोपी मुलगा अमितविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
COMMENTS