अहमदनगर | नगर सह्याद्री अरणगाव (ता. नगर) शिवारात पेट्रोल पंपाच्या बाजुला मोकळ्या जागेत उभ्या केलेल्या ट्रकमधून सुमारे १० लाख २८ हजार ९२० रूप...
अहमदनगर | नगर सह्याद्री
अरणगाव (ता. नगर) शिवारात पेट्रोल पंपाच्या बाजुला मोकळ्या जागेत उभ्या केलेल्या ट्रकमधून सुमारे १० लाख २८ हजार ९२० रूपये किंमतीच्या तीन टन वजनाच्या २९ गाठी अज्ञात चोरट्यांनी पळविल्या. १० सप्टेंबरला रात्री ११ ते ११ सप्टेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी १४ सप्टेंबरला नगर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. जालमसिंह स्वरूपसिंह राजपुरोहित (वय ४० रा. राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. ते राजस्थान येथील बलोत्रा ट्रान्सपोर्टचे मॅनेजर आहे. त्यांच्या ट्रान्सपोर्टच्या ट्रकमधून (टीएन ५२ आर ४६४२) कापडाच्या २९ गाठीची वाहतूक केली जात होती.
हा ट्रक १० सप्टेंबरला रात्री ११ वाजता अरणगाव चौक येथील पेट्रोल पंपाच्या बाजुच्या मोकळ्या जागेत रस्त्याच्या कडेला उभा केला होता. ट्रकमधील कापडाच्या गाठी चोरट्यांनी चोरून नेल्या. ११ सप्टेंबरला पहाटे साडे चारच्या सुमारास चोरीचा प्रकार लक्षात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग करीत आहेत.
COMMENTS