पदवीधर पदोन्नती, चुकीची संचमान्यताविरूद्ध संघटना आक्रमक; शिक्षक नेते प्रवीण ठुबे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी आंदोलनाचा इशारा पारनेर | नगर...
पदवीधर पदोन्नती, चुकीची संचमान्यताविरूद्ध संघटना आक्रमक; शिक्षक नेते प्रवीण ठुबे
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी आंदोलनाचा इशारा
पारनेर | नगर सह्याद्री
शासन आदेशानुसार २०१३ पूर्वी सेवेत आलेल्या प्राथमिक शिक्षकांना टीईटीची कोणतीही अट लागू नसताना जिल्हा परिषदेने पदवीधर पदोन्नती केवळ टीईटीच्या नावाखाली केली नाही. नाशिक आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये पदवीधर पदोन्नती होते. मात्र नगर जिल्हा परिषदेमध्ये का होत नाही? त्यामुळे पदवीधर पदोन्नती, चुकीची संचमान्यता आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी आंदोलनाचा इशारा शिक्षक नेते प्रवीण ठुबे यांच्यासह शिक्षक संघटनांनी दिला आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले, की जिल्हा परिषद अंतर्गत विविध संघटनांनी सातत्याने मागणी करूनही उच्च प्राथमिक वर्गांवर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून पदवीधर शिक्षक पदोन्नती झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. उच्च प्राथमिक वर्गांचे विद्यार्थी संख्या कमी होत आहे. शासन आदेशानुसार २०१३ पूर्वी सेवेत आलेल्या प्राथमिक शिक्षकांना टीईटीची अट लागू नसताना जिल्हा परिषदेने पदवीधर पदोन्नती केवळ टीईटीच्या नावाखाली केली नाही. नाशिक आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये पदवीधर पदोन्नती होते. मात्र नगर जिल्हा परिषदेमध्ये होत नाही. पदवीधर पदोन्नती केल्यानंतर उपाध्यापक पदाच्या अडीचशे ते तीनशे जागा रिक्त होणार आहेत. या जागा गेल्या अनेक वर्षापासून अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सेवा करत आहेत, त्यांना आंतरजिल्हा बदलीसाठी उपलब्ध होतील. इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांना पदवीधर शिक्षक मिळतील व आंतरजिल्हा बदली प्राथमिक शिक्षकांचा देखील प्रश्न बर्याच अंशी मिटेल, अशी संघटनेची धारणा आहे.
बर्याच तालुक्यांमध्ये अतिरिक्त शिक्षक व उपलब्ध जागा यांचे विषम प्रमाण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना नाईलाजाने समायोजन प्रक्रियेमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे बाहेरच्या तालुक्यात सेवेसाठी जावे लागणार आहे. चुकीची संचमान्यता दुरुस्त करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी. चुकीची संचमान्यता दुरुस्त झाल्याशिवाय समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, अशीही मागणी संघटनेने केली आहे. पदवीधर पदोन्नती व केंद्रप्रमुख पदोन्नती झाल्यास उपाध्यापकांच्या भरपूर जागा समायोजनासाठी व आंतरजिल्हा बदलीसाठी उपलब्ध होतील. या प्रक्रिया तातडीने कराव्यात, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.
प्रश्न प्रलंबित असल्यामुळे त्याचा दुरगामी परिणाम जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या स्थैर्यावर तसेच उच्च प्राथमिक वर्ग असणार्या शाळांच्या पटसंख्येवर होत आहे. केंद्रप्रमुख नसल्यामुळे प्राथमिक शिक्षकांकडेच हा अतिरीक्त कार्यभार दिला गेला आहे. त्यामुळे पदवीधर व केंद्रप्रमुख पदोन्नती तसेच चुकीची झालेली संचमान्यता दुरुस्त होणे व आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांसाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे नाईलाजाने आंदोलन करावे लागेल.
-प्रविण ठुबे, शिक्षक नेते
यावर कार्यवाही न झाल्यास संघटना जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे. प्रसिद्धी पत्रकावर संजय शेळके, प्रविण ठुबे, आर. पी. राहाणे, राम निकम, दत्ता गमे, मिलिंद तनपुरे, सुभाष गरुड, बाबा पवार, विकास डावखरे, अविनाश निंभोरे, राजू इनामदार, शंकर गाडेकर, गणपत सहाणे, गणेश वाघ, दादा विधाते, गणेश पिंगळे, स्वाती झावरे-शिंदे, अशोक गिरी, बाळासाहेब बांबळे, संतोष अकोलकर, कल्याण पोटभरे, राजू मुंगसे, श्रीकृष्ण खेडकर, अल्ताफ शाह, बाळासाहेब रोहोकले, रवींद्र कडू, रामदास बाबागोसावी, भीवसेन पवार, राजेंद्र मोहळकर, हनुमंत निंबाळकर, संदीप सुंबे, प्रल्हाद गजभिव, तान्हाजी वाडेकर, चंद्रकांत गावडे, बाळासाहेब शेळके, रविंद्र पायमोडे, राजेंद्र मुसळे, अशोक जाधव, तुषार तुपे, ज्ञानेश्वर इंगळे आदींची नावे आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मंजूर करण्याचे अधिकार तालुकास्तरावर गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना देऊन दोन महिने झाले आहेत. तरीही जिल्ह्यामध्ये फक्त अकोले तालुका वगळता कोणत्याही गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मंजुरीबाबत कारवाई केलेली नाही. या प्रश्नाविरुद्ध संघटना आक्रमक असून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या हक्काची वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेेणी मंजूर झाली पाहिजे, अशी मागणी देखील करण्यात येणार आहे.
COMMENTS