सोलापूर / नगर सह्याद्री सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर आंदोलकांनी भंडारा उधळला. धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाल...
सोलापूर / नगर सह्याद्री
सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर आंदोलकांनी भंडारा उधळला. धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून या आंदोलकांनी थेट सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून जाहीर निषेध नोंदवला आहे.
यावेळी मंत्री विखे पाटील देखील गोंधळले होते. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच आपण या आंदोलकांना माफ केल्याचंही स्पष्ट केलं आहे. विखे पाटील म्हणाले की, भंडारा हा नेहमी पवित्र असतो.
त्यामुळे निश्चितच पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाली त्याचा आनंद आहे. प्रतिकात्मक गोष्टी करण्याची कार्यकर्त्यांची भावना असते. त्यांनी काही वावगं केलं नाही, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान सदर आंदोलकांशी मारहाण करण्यात आली.
यावर विखे पाटील म्हणाले की सुरक्षा रक्षक आणि भाजप कार्यकर्त्यांची ती स्वाभाविक प्रतिक्रिया होती. असा अचानक गोंधळ झाल्यावर अशी प्रतिक्रिया उमटत असते. सुरक्षा रक्षक संरक्षणासाठीच असतात असेही ते म्हणाले. दरम्यान ज्या आंदोलकांनी माझ्यावर भंडारा उधळला. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करू नका, कारवाई करू नका असे आदेश मी दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
COMMENTS