खेळाने यश-अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते; पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप अहमदनगर | नगर सह्याद्री जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नगर ताल...
खेळाने यश-अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते; पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नगर तालुका क्रीडा समितीच्या माध्यमातून नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी (दि.११ सप्टेंबर) रंगतादार कुस्त्यांच्या सामन्यांनी झाले. नगर तालुयातील २२ शाळांमधील ३०० पेक्षा जास्त मल्लांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत पहिल्याच दिवशी कुस्तीचा थरार रंगला होता. या रंगतदार सामन्यात युवा मल्लांनी विविध डावपेचांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन करुन व मल्लांची कुस्ती लावून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे, उद्योजक बाळासाहेब शहाणे, नगर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष तथा नगर तालुका क्रीडा समितीचे उपाध्यक्ष पै.नाना डोंगरे, उपाध्यक्ष पै. संदीप डोंगरे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, युवा महाराष्ट्र केसरी पै. विष्णू खोसे, पै. भाऊसाहेब धावडे, पै. बबन शेळके, पंच गणेश जाधव, भाऊसाहेब जाधव, मल्हारी कांडेकर, समीर पटेल, रमाकांत दरेकर, प्रा. कैलास कोरके, पोपट शिंदे, सोमनाथ राऊत, अनिकेत कर्डिले, क्रीडा शिक्षक बाळासाहेब बोडखे, बद्रीनाथ शिंदे, मिलिंद थोटे, किरण जाधव, संतोष कवडे, गणेश म्हस्के, बाबा भोर, प्रताप बांडे आदींसह शालेय कुस्तीपटू व त्यांचे प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक पै.नाना डोंगरे यांनी केले. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप म्हणाले की, खेळाने मुलांमध्ये यश-अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते. तर मैदानी खेळातून मानसिक व शारीरिक विकास साधला जातो. यश-अपयश महत्त्वाचे नसून स्पर्धेत उतरणे महत्त्वाचे आहे. खेळाचे मैदान विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाने हुरळून जावू नये व आलेल्या अपयशाने खचून न जाण्याची प्रेरणा देत असतो. जीवनात व खेळात यशासाठी सातत्य आवश्यक असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना एकतरी आवडता मैदानी खेळ खेळण्याचे आवाहन केले. नेप्ती, नगर-कल्याण महामार्गावरील अमरज्योत लॉनमध्ये दिवसभर मुलांच्या कुस्त्या रंगल्या होत्या. सदर कुस्त्या मॅटवर १४, १७, १९ वर्ष वयोगटात खेळविण्यात आल्या असून, या दोन दिवसीय स्पर्धेत महिला कुस्तीपटूंचे सामने देखील रंगणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर पटेल यांनी केले. आभार चंद्रकांत पवार यांनी मानले.
COMMENTS